नागपूर : नागपूर शहरामध्ये पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र कुमार सिंगल हे वेगवेगळे उपक्रम राबविण्यासाठी ओळखले जातात. शहरातील वाहतूक तुलनेने शिस्तबद्ध असली तरीही, ती इतर शहरांच्या तुलनेत अधिक सुधारण्यासाठी व नागपूरमध्ये होणाऱ्या प्राणाकिंत अपघातांना रोखण्यासाठी पोलीस आयुक्त नेहमीच तत्पर असतात. असे विविध अनोखे उपक्रम राबवून जन माणसांमध्ये कायदेशीर मार्गाने अवलंब करण्याकरिता नागरिकांना ते सतत अशा उपक्रमाद्वारे मदत करीत असतात.
नागपूर शहरामध्ये प्राणघातक अपघातांची संख्या कमी व्हावी, यासाठी पोलीस आयुक्तांनी एक अनोखा उपक्रम सुरू केला. हेल्मेट वाटप करण्याचा! या उपक्रमांतर्गत नागपूर शहरातील विविध 15 पेक्षा जास्त ठिकाणी 1000 च्या जवळपास हेल्मेट वाटप करण्यात आले. यामध्ये वाडी टी पॉइंट, लोकमान्य नगर, एमआयडीसी टी पॉइंट येथे, लिबर्टी चौक, जुना काटोल नाका, गिट्टीखदान चौक, त्रिमूर्तीनगर चौक , शंकरनगर चौक, व्हेरायटी चौक, आकाशवाणी चौक, लॉ कॉलेज चौक, पडोळे चौक, प्राइड चौक, कोका कोला चौक, कॉटन मार्केट, अग्रसेन चौक, वाठोडा, सक्करदरा, इंदोरा चौक या विविध चौकांमध्ये अशा नागरिकांना थांबवले गेले, ज्यांनी हेल्मेट घातले नव्हते.
या मोहिमेअंतर्गत पोलीस आयुक्त यांनी स्वतः व्हेरायटी चौक आणि लिबर्टी टॉकीज कटिंग येथे जाऊन हेल्मेट वाटप केले. विशेष म्हणजे, नागरिकांना जेव्हा पोलीस आयुक्त स्वतः नियम तोडणाऱ्यांवर कारवाई करत असल्याचे दिसले, तेव्हा त्यांना आश्चर्य वाटले. मात्र, या अनोख्या पद्धतीने एक वेगळा संदेश समाजात पोहोचवण्यात आला.
पोलीस आयुक्त व इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी, ” नागरिकांना हेल्मेट घालण्याचे महत्त्व समजावून सांगितले. हे केवळ हेल्मेट घालण्याचे प्रबोधन नव्हते, तर नागरिकांनी दुचाकी चालवताना नेहमी हेल्मेट घालावे, तसेच मागे बसणाऱ्या व्यक्तींनीही हेल्मेट घालावे, यावर भर दिला गेला. हेल्मेट वापरण्यामुळे केवळ स्वतःचेच संरक्षण होत नाही, तर आपल्या कुटुंबीयांचे आणि आप्तेष्टांचेही रक्षण होते. त्यामुळे हेल्मेट परिधान करण्याची सवय लावावी, वाहतुकीचे नियम पाळावेत आणि जबाबदार नागरिक बनावे, अशी शपथ देखील हेल्मेट न घालणारे वाहन चालकांनी घेतली.
हेल्मेट न घालणारे नागरिकांनी स्वतःहून कबूल केले की, यापुढे ते नेहमी हेल्मेट घालतील आणि त्यांच्या कुटुंबीयांनाही हेल्मेट घालण्यास प्रवृत्त करतील. या हेल्मेट वाटप मोहिमेचे शहरभर कौतुक होत असून, नागपूर पोलिसांनी वाहतूक सुरक्षेसाठी उचललेले हे पाऊल निश्चितच अनुकरणीय ठरले आहे.
सदर हेल्मेट वाटप मोहिमेमध्ये मा. पोलीस आयुक्त ,सह पोलीस आयुक्त श्री निसार तांबोळी, पोलीस उपायुक्त श्री अर्चित चांडक (वाहतूक विभाग), सीताबर्डी झोनचे पोलीस निरीक्षक श्री अनिरुद्ध पुरी, सिताबर्डी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री चकाटे, सदर वाहतूक विभागाचे श्रीमती नंदा मनगटे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनीष ठाकरे इतर अधिकारी व अंमलदार तसेच विविध वृत्तपत्र इलेक्ट्रॉनिक्स मीडियाचे प्रतिनिधी हे उपस्थित होते.