नागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आदिवासी विकास विभागाच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेचे बक्षीस वितरण रविवार,५ जानेवारीला ४.३० वाजता पोलीस लाईन टाकळी येथील पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर शानदार समारंभात पार पडले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत सर्वाधिक ४७५ गुण घेऊन सर्वसाधारण विजेता ठरलेल्या नाशिक विभाग संघाला तसेच ४५४ गुण घेऊन उपविजेता ठरलेल्या नागपूर विभाग संघाला व २८१ गुण घेऊन तृतीय क्रमांक पटकाविलेल्या ठाणे विभाग संघाला मान्यवरांच्या उपस्थितीत चषक देऊन गौरविले.
पाहुण्यांच्या आगमन प्रसंगी मुख्य प्रवेशद्वारापासून ते मंचापर्यंत चंद्रपूर प्रकल्पातील विद्यार्थ्यांनी ढोल ताशाच्या साह्याने स्वागत केले. नागपूर येथील सेंट उर्सुला हायस्कूलच्या विद्यार्थिनीने बांबू नृत्य सादर केले. या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत राज्यातील आदिवासी विकास विभागाच्या नाशिक, नागपूर, ठाणे व अमरावती या चार विभागातील ३० प्रकल्पातील ९७४ मुले व ८९६ मुली असे एकूण १ हजार ८७० खेळाडूंनी सहभाग घेतला.१४, १७ व १९ वर्षे वयोगटात कबड्डी, खो-खो, व्हॉलीबॉल, हँडबॉल ,रिले या सांघिक खेळासह लांबउडी, उंचउडी, गोळाफेक, थाळीफेक ,भालाफेक , धावणे आदी वैयक्तिक खेळ पार पडले. आदिवासी विकास विभाग अंतर्गत राज्यात ४९७ शासकीय आश्रम शाळेत २ लाख १ हजार ३९८ विद्यार्थी शिकत असून ५५३ अनुदानित आश्रम शाळेत २ लाख ५२ हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. राज्यात आदिवासी विकास विभाग अंतर्गत ४९० वसतीगृह असून ५६ हजार विद्यार्थी प्रवेशित झाले आहेत. आश्रम शाळेत शिकत असलेल्या आदिवासी विद्यार्थ्यांना या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेमध्ये त्यांच्या अंगी असलेले कौशल्य व नैपुण्यता दाखविण्याची एक संधी प्राप्त झाली होती. यामध्ये अनेक खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी बजावित राज्यस्तरावर आपले नावलौकिक केले.
खेळासह नागपूर विभागातील शासकीय आश्रम शाळेमध्ये राबविल्या जात असलेल्या ब्रायटर माईंड, मेमरी इन्हान्समेंट, बोलका वर्ग या उपक्रमाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कौतुक केले. यावेळी मंचावर आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांनी ब्रायटर माईंड उपक्रमाचे सादरीकरण करून दाखविले व उपस्थितांना चकित केले. सांघिक खेळाच्या कबड्डी, खो-खो ,व्हॉलीबॉल हँडबॉल व २ रिले या ६ प्रकारात नाशिक संघाने सर्वाधिक १४ प्रथम क्रमांकाचे पारितोषिक फटकाविले.नागपूर संघाने ११, अमरावती संघाने ५ तर ठाणे विभाग संघाने ४ प्रथम क्रमांकाचे पारितोषिक फटकाविले.
सांघिक खेळात कबड्डीचे एकूण २४ सामने झालेत. कबड्डी मध्ये १४ वर्षे वयोगटात मुलांमध्ये ठाणे तर मुलींमध्ये अमरावती संघाने प्रथम क्रमांक पटकाविला.१७ व १९ वर्षे वयोगटात मुले व मुलींमध्ये अमरावती संघाने प्रथम क्रमांक पटकावून कबड्डीमध्ये आपले वर्चस्व प्रस्थापित केले. खो-खो खेळाचे २४ सामने झालेत. खो-खो मध्ये १४ व १९ वर्षे वयोगटात मुले व मुलींमध्ये तर १४ वर्षे मुलांमध्येही नाशिक संघाने प्रथम क्रमांक पटकावून खो-खो खेळामध्ये आपला दबदबा निर्माण केला. १७ वर्षे वयोगट मुलींच्या खो-खो मध्ये नागपूर संघाने प्रथम क्रमांक पटकाविला.
हॉलीबॉलचे एकूण २४ सामने झालेत.व्हॉलीबॉल मध्ये मुलांच्या १४ व १७ वर्षे वयोगटात नागपूर प्रथम तर याच गटात मुलींमध्ये नाशिक संघाने प्रथम क्रमांक पटकाविला.१९ वर्षे वयोगटात मुलांमध्ये नागपूर प्रथम तर मुलींमध्ये नाशिक संघाने प्रथम क्रमांक पटकाविला. व्हॉलीबॉलमध्ये नागपूर संघाने उत्कृष्ट कामगिरी केली. हँडबॉलचे २४ सामने झालेत.हँडबॉल मध्ये १४ वर्षे वयोगटात मुले नागपूर प्रथम तर मुली नाशिक प्रथम , मुले व मुलींच्या १७ वर्षे वयोगटात नाशिक संघाने प्रथम क्रमांक पटकाविला.१९ वर्ष मुलांच्या हँडबॉलमध्ये ठाणे संघाने प्रथम क्रमांक तर मुलींमध्ये नाशिक संघाने प्रथम क्रमांक प्राप्त केले. हँडबॉलमध्येही नाशिक संघाने उत्कृष्ट कामगिरी केली. वैयक्तिक खेळामध्ये अनेक खेळाडू राज्यस्तरावर चमकले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक आदिवासी विकास विभागाचे राज्याचे सचिव विजय वाघमारे (भाप्रसे )यांनी केले.संचालन जवाहर गाढवे तर क्रीडा संचालन संदीप दोनाडकर यांनी केले. कार्यक्रमाला खेळाडूंसह राज्यभरातील आश्रम शाळेतील अधिकारी, कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते. या राज्यस्तरीय क्रीडा संमेलनाच्या यशस्वीतेसाठी आदिवासी विकास विभागातील अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थ्यांनी मोलाचे सहकार्य केले.