सर्व विद्यूत फिडर सौर ऊर्जेवर येणार! मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी प्रकल्प 2.0 चे लोकार्पण

मुंबई – राज्यभरात सौर उर्जेचा वापर करणारे सौर ग्राम आपण तयार करत आहोत. यामुळे शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध होणार असून भविष्यात या हरित उर्जेच्या माध्यमातून शेतकरी हरित क्रांती घडवतील, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी प्रकल्प 2.0

मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी प्रकल्प 2.0 अंतर्गत वाशिम जिल्ह्यातील उंबरठा आणि धाराशिव जिल्ह्यातील नारंगवाडी येथील प्रकल्पांचे लोकार्पण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे करण्यात आले. यावेळी मुख्य सचिव सुजाता सौनिक, ऊर्जा विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव आभा शुक्ला, जलसंपदा विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव दीपक कपूर, गृहनिर्माण विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव वल्सा नायर, वित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव ओ.पी. गुप्ता, सहकार विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव राजगोपाल देवरा, मुख्यमंत्र्यांच्या प्रधान सचिव अश्विनी भिडे, मुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ. श्रीकर परदेशी यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते.

शेतकऱ्यांना मिळणार दिवसा वीज

यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, की मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेमुळे शेतकऱ्यांना दिवसा शाश्वत आणि मोफत वीज उपलब्ध होणार आहे. तसेच शासनावरचा बोजा देखील कमी होणार आहे. सध्या आपण राज्यातील शेतकऱ्यांना 16 हजार मेगावॅट इतकी वीज देतो. हे सर्व फीडर सौरऊर्जेवर आणण्याचे काम आपण दोन वर्षापासून सुरू केले आहे. टप्प्याटप्प्याने हे सर्व फिडर सौर उर्जेवर आणण्यात येतील. त्यामुळे भविष्यात शेतकऱ्यांसाठीचे मोफत वीज योजना ही सरकारवर बोजा राहणार नाही आणि शेतकऱ्यांना दिवसाही वीज उपलब्ध होऊ शकेल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.