नागपूर : सध्या लोकांचा ऑनलाईन पद्धतीने व्यवहार करण्याचा कल जास्त वाढलेला आहे. एसटी म्हणा किंवा रेल्वे स्थानकांवर लोक लांब रांगेत उभे राहून तिकीट काढायचे. मात्र आता जनता देखील जगासोबत पुढे जात आहे. त्या भल्या मोठ्या रांगेत उभे राहण्यापेक्षा ऑनलाईन पद्धतीने तिकीट काढण्याचा कल जास्तीत जास्त वाढला आहे. आता रेल्वे प्रवासी तिकीट काढण्यासाठी काउंटरवर उभे राहून तिकीट घेण्यापेक्षा क्यूआर कोडच्या माध्यमातून तिकीट काढतात. त्यामुळे सध्या जास्तीत जास्त प्रमाणात रेल्वे प्रवासी तिकीट विक्रीचा व्यवहार क्यूआर कोडचा वापर करून करत असल्याचे समोर आले आहे.
दरम्यान, गेल्या ५० दिवसांमध्ये क्यूआर कोडच्या माध्यमातून रेल्वे प्रवाशांनी तीन कोटी रुपयांच्या तिकिटांची खरेदी केली आहे. तसेच, ऑनलाइन तिकीट खरेदी-विक्रीचा व्यवहार रेल्वे प्रवासी आणि रेल्वे कर्मचारी या दोघांसाठीही सोयीचा ठरला असल्याचे समजते .
प्रवाशांकडून भरघोस प्रतिसाद…
काही महिन्यांपूर्वी रेल्वे प्रशासनाने प्रवाशांची गर्दी कमी व्हावी तसेच त्यांचा वेळ वाचावा याकरता तिकीट खरेदी करण्यासाठी क्यूआर कोडचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. रेल्वे प्रशासनाच्या या निर्णयाला आता रेल्वे प्रवाशांकडून भरघोस प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे तासनतास गर्दीच्या रांगेत ताटकळत उभे राहून तिकीट काढण्यापेक्षा प्रवासी आता कोड स्कॅन करून हवे ते रेल्वे तिकीट विकत घेऊ शकतात.
ऑनलाइन तिकीटचा व्यवहार अधिक सोयीस्कर!
ऑनलाइन तिकीट खरेदी-विक्रीचा व्यवहार रेल्वे प्रवासी आणि रेल्वे कर्मचारी या सर्वांसाठी सोयीस्कर आहे. कारण प्रवाशांना रांगेत उभे राहण्याची गरज राहत नाही. तसेच कर्मचाऱ्यांना सुट्या पैशांसाठी प्रवाशांसोबत वाद घालण्याची वेळ येत नाही. महत्त्वाचे म्हणजे ऑनलाइन पद्धतीचा व्यवहार झटपट पार पडतो. त्यामुळे हे रेल्वे प्रवासी आणि रेल्वे प्रशासन दोघांसाठी देखील फायदेशीर ठरत आहे.
नागपुरात एक लाख, ५४ हजार प्रवाशांनी घेतले तिकीट!
माहितीनुसार, १ सप्टेंबर ते २० ऑक्टोबर २०२४ पर्यंत नागपूर विभागात एक लाख, ५४ हजार प्रवाशांनी क्यूआर कोडच्या माध्यमातून अनारक्षित तिकीट विकत घेतले. त्यामुळे रेल्वेच्या तिजोरीत एक कोटी, २३ लाख, ५५ हजार ९३६ रुपये जमा झाले. दुसरीकडे २६, ४८९ प्रवाशांनी १ कोटी, ४९ लाख, ५८ हजार रुपयांचे विविध श्रेणीचे आरक्षित तिकीट खरेदी केले असल्याचे समजते.