बारामती : बारामतीत पुन्हा एकदा पवार विरूद्ध पवार असा सामना पाहायला मिळणार आहे. काही महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे विरूद्ध अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार असा सामना रंगला होता. यात सुप्रिया सुळे विजयी झाल्या होत्या. आता पुन्हा एकदा विधानसभेत पवार विरुद्ध पवार असा सामना पाहायला मिळणार आहे.
दरम्यान, महाविकास आघाडीच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षातर्फे बारामतीत योगेंद्र पवार यांनी आपला उमेदवारी अर्ज भरला. यावेळी येथे शरद पवार सुप्रिया सुळे यांच्यासह संपूर्ण पवार कुटुंबीय आणि इतर कार्यकर्ते उपस्थित होते. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत बारामती विधानसभा मतदारसंघातील जनता प्रचंड मताने योगेंद्र पवार यांना विजयी करेल, असा विश्वास शरद पवार यांनी व्यक्त केला.
नेमके काय म्हणाले शरद पवार?
बारामतीमधून युगेंद्र पवार या युवा नेत्यास आम्ही उमेदवारी दिली आहे. लोकसभा निवडणुकीत बारामतीने सुप्रिया ताईंना बहुमत दिले होते. आता युगेंद्र पवार विजयी होतील. बारामती मतदारांची मला जितकी माहिती आहे, तितकी इतर क्वचितच कोणाला असेल. मला महाराष्ट्रातील राजकारणात शक्ती देण्याचे काम बारामतीने दिले. आता या निवडणुकीत बारामतीकर युगेंद्र पवार याला मोठ्या मताधिक्याने विजयी करतील, असे शरद पवार म्हणाले.
आताच लाडकी बहिणींची आठवण!
महायुती सरकारची सत्ता अडीच वर्षांपासून आहे. त्यापूर्वी त्यांना कधी लाडकी बहीण आठवली नाही. लाडकी बहीण योजना चार महिन्यांपूर्वी आली. कारण लोकसभेत त्यांना मतदारांनी धडा शिकवला होता. त्यानंतर ही योजना आहे. त्यापूर्वी कधी त्यांची आठवण झाली नाही, असा टोला देखील महायुती सरकारला शरद पवार यांनी लगावला.
बहुसंख्य ठिकाणी एकमत आहे!
राज्यात काही मतदारसंघात मविआच्या दोन घटक पक्षांच्या उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. ज्या जागांवर काही अडचण असेल तेथे दोन्ही पक्षांना फॉर्म भरुन ठेवायला सांगितले आहे. परंतु उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी अजून अवकाश आहे. आघाडीत अशी चर्चा करण्याची आवश्यकता असते. बहुसंख्य ठिकाणी एकमत आहे. काही ठिकाणी अडचणी आहे त्यातून आम्ही निश्चित मार्ग काढू. कोण किती जागा लढवेल हे मला माहित नाही. आमचे पक्षाचे राज्याचे अध्यक्ष ते काम पाहतात. उरलेली यादी ते आज जाहीर करतील, अशी माहिती यावेळी शरद पवारांनी दिली.
शरद पवारांचा युगेंद्र पवार यांना सल्ला काय?
युगेंद्र पवार या एका अत्यंत उच्चशिक्षीत युवकास महाविकास आघाडीच्यावतीने आम्ही बारामती विधानसभा मतदारसंघातून संधी दिली आहे. ते उच्चशिक्षित पदवीधर आहेत. परदेशात त्यांचे शिक्षण झाले आहे. प्रशासन, व्यवसायातील त्यांना माहिती आहे. विशेषतः साखर धंदा, ऊसाचे पिक यातील ते जाणकार आहेत. त्यांना बारामतीची जनता नव्या पिढीतील नव्या नेतृत्वाचा स्वीकार करुन त्यांच्या पाठीशी आपली शक्ती उभी करतील. मी ५७ वर्षापूर्वी बारामतीच्या तहसिल कार्यालयात स्वतःचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आलो होतो. त्यानंतर आजपर्यंत बारामतीच्या जनतेने मला निवडून दिले आहे. सलग ५७ वर्ष एखाद्या व्यक्तीला सतत निवडून देण्याचे कारण जनतेशी बांधिलकी हे होते. नव्या उमेदवारांना माझे हेच सांगणे आहे की जनतेशी कायम बांधिलकी ठेवा. जनतेने निवडून दिल्यानंतर त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्नशील राहा. हाच माझा युगेंद्र पवार यांना सल्ला असल्याचे पवार म्हणाले.