सीताफळ खाण्याचे हे आहेत ‘४’ फायदे; अनेक आजारांवर गुणकारी, वाचा सविस्तर माहिती!

Health tips : सीताफळ या फळामध्ये अनेक गुणधर्म आहेत. हे फळ मुळचे वेस्ट इंडीज बेटे व दक्षिण अमेरिकेचे आहे. सीताफळाचे झाड सहजच कुठेही, माळरानावर उगवते किंवा त्याची लागवडही करता येते. बदलत्या ऋतूनुसार अनेक फळे बाजारात दाखल होतात. त्यानुसार फळांचे सेवन केले पाहिजे. सीताफळ खाण्यासाठी चविष्ट लागते. सीताफळात कॅल्शिअम, लोह, थायमीन, रिबोफ्लेविन, नियासिन, ‘क’ जीवनसत्त्व व ‘बी वन’ व ‘बी टू’ जीवनसत्त्व आढळतात. तसेच त्यात आर्द्रता, प्रथिने, मेद, तंतुमय, पिष्टमय पदार्थ व नैसर्गिक फलशर्कराही भरपूर प्रमाणात असते.

दरम्यान, आयुर्वेदानुसार सीताफळ हे शीत, मधुर रसाचे, पित्तशामक, कफकारक व तृषाशामक आहे. तसेच हृदय, रक्तवर्धक, बलवर्धक, मासवर्धक, वातशामक आणि तृप्तीदायकही आहे. हे फळ डायबिटीज नियंत्रित ठेवण्यास मदत करते. यासह अस्थमा असलेल्या रुग्णांसाठी देखील हे फळ किफायतशीर आहे. तसेच, आपल्या मातीत पिकणाऱ्या गोष्टी आपल्या शरीराला आवश्यक पोषणमूल्ये देतात. म्हणूनच आपण सफरचंद, किवी, चेरी अशी फळे खाण्यापेक्षा केळी, आंबा, सिताफळ, जांभूळ, बोरं यांसारखी लोकल फळे आवर्जून खावीत असे तज्ज्ञ सांगतात. सीताफळ हे आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर असणारे फळ वर्षातून एकदाच थंडीच्या दिवसांत येते.

भरपूर ऊर्जा देणारे हे फळ बाजारात अतिशय स्वस्तात मिळते. सिताफळामध्ये आरोग्यासाठी फायदेशीर असंख्य घटक असून आपल्या आहारात आवर्जून सिताफळाचा समावेश करायला हवा. आपल्याला शुगर आहे, आपण लठ्ठ आहोत म्हणून अनेक जण सिताफळ खाणे टाळतात पण तसे न करता प्रत्येकाने सिताफळ खायला हवे. पाहूयात सिताफळाचे आरोग्याला होणारे फायदे काय?

१. हाडं मजबूत राहण्यास मदत

थंडीच्या दिवसांत आपल्याला जास्त ऊर्जा लागते. तसेच गारठ्याने हाडे दुखण्याची शक्यता असते. सिताफळात लोह, कॅल्शियम मॅग्नेशियम, फॉस्फरस हे घटक असल्याने हाडांसाठी हे फळ अतिशय चांगले असते. यामुळे थंडीत होणारा संधीवात, सांधेदुखी यांसारख्या जुन्या समस्या डोके वर काढत नाहीत.

२. मधुमेहावर उपयुक्त

सिताफळ खूप गोड असते त्यामुळे डायबिटीस असणाऱ्यांनी सिताफळ खाऊ नये असे काहींना वाटते. मात्र सिताफळात असणारे घटक डायबिटीससाठी फायदेशीर असतात. त्यामुळे इन्शुलिनची पातळी नियंत्रणात राहण्यास मदत होते. त्यामुळे डायबिटीस असेल तरी योग्य त्या प्रमाणात सिताफळ खायला हरकत नाही.

३. हृदयरोगावर रामबाण

सिताफळामध्ये पोटॅशियम आणि मॅग्नेशियम चांगल्या प्रमाणात असते. हे दोन्ही घटक हृदयाचे कार्य सुरळीत राहण्यासाठी फायदेशीर असतात. तसेच सिताफळामुळे बॅड कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रणात राहण्यास मदत होते. त्यामुळे हृदयविकाराचा त्रास असणाऱ्यांनी आवर्जून हे फळ खायला हवे.

४. प्रतिकारशक्ती सुधारते

सिताफळामध्ये अँटीऑक्सिडंटस आणि व्हिटॅमिन सी दोन्हीही चांगल्या प्रमाणात असते. हे दोन्ही घटक प्रतिकारशक्ती चांगली राहण्यास उपयुक्त असतात. त्यामुळे प्रतिकारशक्ती चांगली ठेवण्यासाठीही सिताफळ खायला हवे.