अवघ्या काही दिवसांवर दिवाळी येऊन ठेपली आहे. सण-उत्सवाच्या या पार्श्वभूमीवर बाजारात सध्या अमूलचे बनावट तूप विकले जात आहे. बनावट तूप विकणाऱ्यांना अमूलने इशारा दिला आहे. याबाबत कंपनीने म्हटले आहे की, बाजारात अमूलच्या नावाने बनावट तूप विकले जात आहे. विशेषत: अशा एक लिटर रिफिल पॅकमध्ये, हे तूप विकले जात आहे, जे अमूल कंपनी तीन वर्षांपासून बनवत नाही. त्यामुळे ग्राहकांनी आपली फसवणूक टाळण्यासाठी तूप खरेदी करण्यापूर्वी पॅकेजिंग तपासून घेणे अतिशय आवश्यक आहे.
दरम्यान, अमूल कंपनीने ग्राहकांच्या कोणत्याही शंका किंवा तक्रारींसाठी नंबर देखील जारी केला आहे. तसेच, भारतातील अनेक लोक अमूल डेअरीतूनच तूप खरेदी करतात. पण ही कंपनी इतकी प्रसिद्ध आहे की अनेक फसवणूक करणारे त्याचा फायदा घेतात. अमूलच्या नावाने अनेक बनावट उत्पादनेही बाजारात विकली जात आहेत. अलीकडेच अमूल कंपनीने स्वतः सोशल मीडियावर एक पोस्ट केली होती ज्यामध्ये असे सांगण्यात आले होते की, बनावट अमूल तूप बाजारात विकले जात आहे. यासोबतच कंपनीने सांगितले की, तुम्ही बनावट तूप कसे ओळखाल.
बनावट तूप कसे ओळखाल?
भारतीय दूध ब्रँडमध्ये ‘अमूल’ हे एक प्रसिद्ध आणि विश्वासू दूध मानले जाते. अमूलचे अनेक उत्पादन बाजारात विकली जातात. यामध्ये दूध, तूप, लोणी, दही आदी उत्पादने विकली जातात. मात्र, सध्या अमूल कंपनीच्या नावाने बनावट तूप विकले जात असल्याचे कंपनीच्या निदर्शनास आले आहे. याबाबत अमूल कंपनीने एक जाहिरात जारी करून ग्राहकांना सावधानतेचा इशारा दिलाय. काही एजंट अमूलचे लेबल चिकटवून अमूल कंपनीचे तूप आहे असे सांगून बनावट डिस्ट्रीब्यूट करत आहेत. हे बनावट तूप एक लिटरच्या पॅकेटमध्ये पॅक करून दिले जाते. परंतु कंपनीने असे एक लिटरचे पॅकेट मागील 3 वर्षापासून उत्पादित केले नसल्याचे कंपनीने सांगितले आहे.
तक्रारीसाठी ‘या’ नंबरवर संपर्क साधावा..
दरम्यान, ग्राहकांनी कोणतेही प्रॉडक्ट विकत घेताना ते तपासून पाहावे. तसेच अमूलचे तूप सुद्धा विकत घेताना तपासून पाहावे. बनावट अमूलच्या तुपापासून वाचण्यासाठी ड्युप्लिकेशन प्रूफ कार्टन पॅकची सुरुवात केलीय. हे पॅकेजिंग अमूलच्या आयएसओ प्रमाणित डेअरिंमध्ये तंत्रज्ञानाच्या साह्याने तयार केले आहे. या तंत्रामुळे तुपाची गुणवत्ता निश्चित होते. त्यामुळे ग्राहकांनी तूप खरेदी करण्याआधी एकदा हे पॅकेजिंग तपासून घ्यावे. तसेच कोणताही गैरप्रकार निदर्शनास आल्यास ग्राहकांनी तक्रारीसाठी 1800 258 3333 या नंबरवर संपर्क साधावा, असे अमूल कंपनीने ग्राहकांना आवाहन केले आहे.
बनावट वस्तू येऊ न देण्याचे काम केले पहिजे..
बनावट तुपाचे प्रकार थांबवण्यासाठी ग्राहकांनी जागृत राहिले पाहिजे. कोणतेही जिन्नस किंवा वस्तू खरेदी करताना ग्राहकांनी ते तपासून पाहावे. तसेच, बाजारात कोणतीही बनावट वस्तू किंवा जिन्नस येऊ न देण्याचे काम हे अन्य आणि औषध प्रशासनाने केले पाहिजे.
2023 मध्ये अमूल जगात दहाव्या क्रमांकावर..
अमूल कंपनी ही भारतातील सर्वात मोठी डेअरी कंपनी आहे. 2023 मध्ये अमूल जगात दहाव्या क्रमांकावर होते. भारतातील प्रत्येक दुसरे-तिसरे कुटुंब अमूल डेअरीकडून दूध खरेदी करते. भारतातही अनेकांना अमूलची जाहिरात आठवते. ज्यामध्ये अनेक मुले मिळून ‘भारत अमूल दूध पितात’ असे म्हणतात. दुधाशिवाय अमूलची इतर उत्पादनेही प्रसिद्ध आहेत आणि अमूलही अतिशय दर्जेदार मानली जाते.