नवी दिल्ली : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवार अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीमधील जागावाटपाचा वाद मिटलेला नाही. आता हा वाद थेट दिल्ली दरबारी पोहोचला आहे. राज्यात काँग्रेसला कमी जागा मिळाल्याने दिल्लीतील CEC च्या बैठकीत विरोधी पक्षनेते राहुल गांधी राज्यातील काँग्रेस नेत्यांवर कमालीचे नाराज झाले आहेत. मित्रपक्षांसोबत वाटाघाटी करण्यात राज्यातील नेते कमी पडल्यामुळे राहुल गांधी नाराज झाल्याची माहिती मिळत आहे. याबद्दल महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षनाना पटोले यांनी माहिती दिली.
दरम्यान, काँग्रेसच्या निवडणूक कमिटीच्या बैठकीत (सीईसी) राहुल गांधींनी आपली नाराजी बोलून दाखवली आहे. महाविकास आघाडी झालेल्या जागावाटपाच्या चर्चांमध्ये राज्यातील नेत्यांनी वाटाघाटी व्यवस्थित केली नाही. तसेच राज्यात देण्यात आलेल्या ओबीसी उमेदवारांबाबतही राहुल गांधी नाराज असल्याचे बोलले जात आहे.
काय म्हणाले नाना पटोले?
माध्यमांशी बोलताना नाना पटोले यांनी सांगितले की, काँग्रेस पक्षाला माध्यमांतून टार्गेट केले जात आहे. आमचे नेते राहुल गांधींचे बरोबर आहे की, महाराष्ट्रात काँग्रेसला जास्त जागा मिळाल्या पाहिजे. मेरिटच्या आधारावर विशेषकरून विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि मुंबई या भागात काँग्रेसला जास्त जागा मिळायला हव्यात. पण, आघाडी धर्मामुळे जागावाटपाचा घोळ झाला आहे. देशातील तसेच राज्यातील सर्व समाजाच्या लोकांना प्रतिनिधित्व मिळावे, ही राहुल गांधींची अपेक्षा आहे. सगळ्यांना सत्तेचा वाटा मिळाला पाहिजे, ही भूमिका राहुल गांधींची आहे. त्या हिशोबाने आम्ही जास्तीत जास्त ओबीसी लोकांना तिकीट देण्याचा प्रयत्न केला आहे, असे नाना पटोले यांनी सांगितले.
सोशल इंजिनिअरिंग हा राहुल गांधींचा अजेंडा!
सोशल इंजिनिअरिंग हा राहुल गांधींचा ( Rahul Gandhi ) अजेंडा आहे. सत्तेचा वाटा सगळ्यांना मिळाला पाहिजे ही राहुल गांधी ( Rahul Gandhi ) यांची भूमिका आहे. जागा वाटप जसे ठरले त्या त्या जागांमध्ये आम्ही ओबीसी चेहरा ठेवला आहे. आमचा एकच मुद्दा आहे की शाहू, फुले आंबेडकरांच्या विचारांना संपवणाऱ्या सरकारला बाहेर काढणे हा आमचा मानस आहे. त्यासाठी आम्ही समझौता करु. मेरिटवर जागा मिळाव्यात असा आमचा प्रयत्न असणार आहे. बाळासाहेब थोरात उद्धव ठाकरेंशी आणि शरद पवारांशी चर्चा करणार आहेत. शनिवारी आमची एक बैठक पार पडेल. उरलेल्या जागांचा निर्णय लवकरच जाहीर केला जाईल, अशिदेखील माहिती नाना पटोले यांनी दिली.