नागपूर : राज्यात आज अनेक मोठे नेते आपला उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत. अशातच राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या नागपूरच्या दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून उमेदवार असलेले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे देखील आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत. यावेळी जोरदार शक्तिप्रदर्शन करत संविधान चौकातून ते आपला नामांकन अर्ज भरण्यासाठी रॅली काढणार आहेत. त्यानंतर ते तहसील कार्यालयात जात आपला अर्ज सादर करणार असल्याचे समजते.
दरम्यान, यापूर्वी देवेंद्र फडणवीसांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्या घरी जात आशीर्वाद घेतले आणि यावेळी त्यांचे गडकरी कुटुंबीयांकडून औक्षण देखील करण्यात आले. देवेंद्र फडणवीस यंदा सलग सहाव्यादा आपला उमेदवारी अर्ज दाखल करत आहे. मात्र २०२४ ची निवडणूक देवेंद्र फडणवीसांसाठी मोठे आव्हान देणारी असल्याचे बोलले जात आहे. तसेच, देवेंद्र फडणवीस यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्याआधी नितीन गडकरी यांचे छोटेखानी भाषण झाले, यावेळी बोलताना गडकरी यांनी फडणविसांचे तोंडभरून कौतुकही केले आहे.
नागपूरमध्ये देवेंद्रजींनी करुन दाखवले…
नितीन गडकरी म्हणाले, मला सांगताना आनंद होत आहे की, देवेंद्रजींनी महाराष्ट्रात नागपूरच्या विकासाला प्राधान्य दिले. आपल्याला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्ष झालीत. त्यात काँग्रेसला ६०-६५ वर्ष राज्य करण्याची संधी मिळाली. मात्र तरीही काँग्रेस जे ६० वर्षात करु शकली नाही, ते महाराष्ट्रात आणि नागपूरमध्ये देवेंद्रजींनी करुन दाखवले, असे म्हणत गडकरी यांनी फडणविसांचे कौतुक केले.
देवेंद्रजी सारखा नेता नागपूरने महाराष्ट्राला दिलाय!
नितीन गडकरी विकसित नागपूरबाबत बोलताना म्हणाले, आम्ही पुन्हा एकदा नागपूरला देशातील सुंदर, स्वच्छ, प्रदूषणमुक्त शहर बनवल्याशिवाय राहणार नाही. मिहान प्रकल्पात आतापर्यंत ७८ हजार नागपूरच्या, विदर्भातल्या भूमिपुत्रांना रोजगार मिळाला आहे. बाकीच्या नेत्यांना त्यांच्या मुलाबाळांच्या तिकीटाची चिंता आहे. पण आम्हाला नागपूरच्या युवकांच्या रोजागाराची चिंता आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच, देवेंद्रजींच्या रुपाने महाराष्ट्राचा चित्र बदलू शकणारा नेता नागपूरने महाराष्ट्राला दिलाय, असेदेखील ते म्हणाले.
नागपूरचा विकास जनतेमुळे झालाय!
मी तुमच्या सर्वांच्या आशिर्वादाने नागपूरचा खासदार म्हणून निवडून आलो. या १० वर्षात नागपूर शहरात १ लाख कोटी रुपयापेक्षा जास्त कामे झाली. यावेळी नागपूरच्या गल्ली-बोळात फिरलो, झोपडपट्टीमध्ये काँक्रीटचे रस्ते बांधलेत. २४ तास पाणी नागपूरमध्ये उपलब्ध आहे, हा सर्व विकास माझ्यामुळे देवेंद्र फडणवीस किंवा चंद्रशेखर बावनकुळेंमुळे झालेला नाही. हा नागपूरचा विकास झाला, तो समोर बसलेल्या जनतेमुळे. तुम्ही आशिर्वाद दिला नसता, तुम्ही ताकद दिली नसती, तर आम्ही हे चित्र बदलूच शकलो नसतो, असे नितीन गडकरी यांनी नमूद केले.