नागपूर : ‘दाना’ चक्रीवादळ रौद्र रूप धारण करू लागले आहे. आता ते ओडिशाच्या किनाऱ्याकडे सरकत असून, राज्यातील जवळपास निम्म्या लोकसंख्येवर परिणाम होण्याची भीती आहे. दुसरीकडे, बुधवारी ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या किनारपट्टी भागात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला, त्यामुळे सामान्य जनजीवन विस्कळीत झाले.
दरम्यान, चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर पूर्व आणि दक्षिण पूर्व रेल्वेने २४ आणि २५ ऑक्टोबर रोजी एक्स्प्रेस आणि लोकलसह ५५२ गाड्यांचे संचालन रद्द केले आहे. हवामान खात्याने सांगितले की, चक्रीवादळ शुक्रवारी पहाटे भितरकनिका राष्ट्रीय उद्यान आणि ओडिशातील धामरा बंदर दरम्यानच्या किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता आहे आणि वारे ताशी १२० किलोमीटर वेगाने वाहतील.
नेमक्या किती गाड्या रद्द?
१२० किलोमिटर पेक्षा जास्त प्रति तास वेग असलेल्या दानाचा केवळ ओडिशा आणि पश्चिम बंगालच नव्हे तर विविध प्रांतावर प्रतिकुल परिणाम होणार आहे. कारण या चक्रीवादळाच्या भीतीमुळे साउथ ईस्ट रेल्वेने १५०, ईस्ट कोस्ट रेल्वेने १९८, ईस्टर्न रेल्वेने १९० तर साउथ ईस्ट सेंट्रल रेल्वेने १४ गाड्या रद्द केल्या आहेत. विशेष म्हणजे, ओडिशा आणि पश्चिम बंगालमध्ये नागपूर मार्गे रोज जाणाऱ्या आणि येणाऱ्या रेल्वे गाड्यांची संख्या मोठी आहे. अशात एकूण ५५२ गाड्या रद्द करण्यात आल्यामुळे सर्वच मार्गावरील आणि बहुतांश प्रदेशातील प्रवाशांना त्याची झळ पोहचली आहे. नागपूर मार्गे हावडा, जगन्नाथ पुरी कडे धावणाऱ्या अनेक गाड्या उशिरा धावत असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.
प्रवाशांची प्रचंड गैरसोय!
भुसावळ विभागातील बडनेरा येथील ‘यार्ड रीमॉडेलिंग’च्या कार्यासाठी ‘पूर्व-नॉन इंटरलॉकिंग’ दरम्यान काही प्रवासी गाड्या शॉर्ट टर्मिनेट करण्यात आल्या आहेत. या गाड्यांच्या नियोजित शेवटच्या व गाडी सुटण्याच्या स्थानकांमध्ये बदल केला. १९ ऑक्टोबरपासून प्रवासी गाड्यांचे ‘शॉर्ट टर्मिनेशन’करण्यात आले असून ते २५ ऑक्टोबरपर्यंत कायम राहणार असल्यामुळे, प्रवाशांची प्रचंड गैरसोय होत आहे.
चक्रीवादळामुळे महाराष्ट्राला किती धोका?
दरम्यान दाना चक्रीवादळामुळे महाराष्ट्राला किती धोका पोहोचणार? याबद्दल सध्या नागरिकांच्या मनात प्रश्न निर्माण झाले आहेत. काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रातल्या काही भागांमध्ये मोठ्या प्रमाणात झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे आधीच मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे या चक्रीवादळाचा तडाखा महाराष्ट्राला बसणार का? असा प्रश्न पडत होता. मात्र, अद्यापतरी या वादळाचा महाराष्ट्राला कुठलाही धोका पोहोचणार नाही असे चित्र आहे.