मुंबई : महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीची घोषणा झाल्यापासून राज्यातील राजकीय घडामोडींना कमालीचा वेग आला आहे. महायुती व महाआघाडीची जागावाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात आली असून काही पक्षांकडून उमेदवारही जाहीर करण्यात आले आहेत. त्यातच लोकसभेला बिनशर्त पाठिंबा देणाऱ्या मनसेच्या उमेदवारांना महायुतीकडून पाठिंबा मिळणार असल्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे महायुती लोकसभेचा पैरा विधानसभेला फेडणार असल्याचे बोलले जात आहे.
दरम्यान, मनसेच्या काही उमेदवारांना पाठिंबा देण्यासंदर्भात महायुतीच्या नेत्यांसोबत राज ठाकरे यांची शनिवारी रात्री बैठक झाल्याचे सांगितले जात आहे. मुंबईत एका हॉटेलमध्ये शनिवारी रात्री शिंदे-फडणवीस आणि ठाकरे यांच्यात विधानसभेच्या रणनितीबाबत चर्चा झाली. या बैठकीत काही मतदारसंघाबाबत मनसे-महायुती युतीबाबत खलबतं झाली. दोन तास झालेल्या या चर्चेत शिवडी, वरळी आणि माहिम या मतदारसंघासह इतर काही जागांबाबत चर्चा झाली आहे. त्यामुळे आता महायुती आणि मनसे काय निर्णय घेणार? याकडे हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विधानसभा निवडणूक स्वबळावर लढणार असल्याचे जाहीर करत राज्यात दौरेही काढले होते. मनसे अध्यक्ष राज ठाकरे मराठवाडा आणि विदर्भ दौऱ्यावर असताना त्यांनी मनसेच्या उमेदवारांची घोषणा देखील केली होती. त्यानुसार, आत्तापर्यंत ७ उमेदवार जाहीर करण्यात आले असून राज ठाकरेंनी पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातून दिलीप धोत्रे यांना उमेदवारी दिली आहे. दरम्यान, शिंदे – फडणवीस यांच्यासोबत राज ठाकरे यांनी शनिवारी रात्री गुप्त बैठक घेतली. या बैठकीत महायुतीत पुन्हा बिनशर्त पाठिंब्याबाबत चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे.
काय म्हणाले मनसे नेते यशवंत किल्लेदार?
कोणत्या पक्षासोबत युती करायची किंवा नाही याबाबतचा निर्णय आमच्या पक्षात राज ठाकरेच घेत असतात. त्यामुळे या चर्चेबाबत ते स्वत:च सांगू शकतील. राज ठाकरे यांची पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी जी बैठक झाली त्यात या विषयावर कोणतीही चर्चा झाली नाही, असे मनसे नेते यशवंत किल्लेदार यांनी स्पष्ट केले.
आमच्यासोबत येण्यास हरकत नसावी…
मतांचे विभाजन होऊ नये म्हणून राज ठाकरे यांनी महायुतीसोबत आले पाहिजे. महायुतीने आजपर्यंत त्यांचा सन्मानच राखला आहे. मुख्यमंत्री शिंदे, देवेंद्र फडणवीस त्यांच्यापासून कधी अंतर ठेवून वागले नाहीत. त्यांना आमच्यासोबत येण्यास हरकत नसावी. आले तर त्यांचे स्वागतच करू असे शिंदेसेनेचे नेते संजय शिरसाट म्हणाले.