राष्ट्रवादीच्या घड्याळाचे काटे जोमाने फिरणार..! अजित दादांकडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर!

मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी २७ स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये अजित पवार, प्रफुल पटेल यांच्यासह पक्षातील ज्येष्ठ नेते आणि तरुण तुर्क नेत्यांचा मिलाप साधण्यात आला आहे. परंतु पक्षातील महत्त्वाचे नेते नवाब मलिक यांचा समावेश मात्र स्टार प्रचारकांच्या यादीत केला नसल्याने सर्वत्र चर्चा होत आहे.

दरम्यान, ट्विटरवर स्टार प्रचारकांची यादी जाहीर करताना अजित पवार यांनी लिहिले की, “महाराष्ट्रात फक्त गुलाबी वादळ वाहणार, राष्ट्रवादीचे घड्याळ जोमाने फिरणार आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विकासाचा राष्ट्रवादी विचार सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्टार प्रचारकांची यादी पुढीलप्रमाणे जाहीर करण्यात येत आहे.

नवाब मलिक यांचे नाव नाही!

या स्टार प्रचारकांच्या यादीत नवाब मलिक यांचे नाव नाही. या मुद्द्यावर शरद पवार गटाच्या नेत्यांनी अजित पवार यांना घेरले आहे. नवाब मलिक हे यापूर्वी शरद पवार गट राष्ट्रवादीत होते. गेल्या वर्षीच ते अजित पवार गटात सामील झाले. शरद पवार गटात असताना नवाब मलिक अनेकदा भाजपवर हल्लाबोल करायचे. अनेक मुद्द्यांवर त्यांनी भाजपला कोंडीत पकडण्याचाही प्रयत्न केला. आता अजित पवार गटात सामील झाल्यानंतर पक्षाने त्यांचा स्टार प्रचारकांच्या यादीतही समावेश केला नसल्याने शरद पवार गटाने यावरून टीका देखील केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे हे आहेत स्टार प्रचारक!

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल, प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे, ज्येष्ठ नेते मंत्री छगन भुजबळ, सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील, कृषीमंत्री धनंजय मुंडे, वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, महिला व बाल विकासमंत्री अदिती तटकरे, खासदार नितीन पाटील, सयाजी शिंदे, आमदार अमोल मिटकरी, अल्पसंख्याक नेते जल्लाउद्दीन सैय्यद, युवकचे राष्ट्रीय अध्यक्ष धीरज शर्मा, महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर, आमदार इद्रीस नायकवडी, युवक प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण, ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष कल्याण आखाडे, सामाजिक सेलचे प्रदेशाध्यक्ष सुनिल मगरे, महेश शिंदे, राजलक्ष्मी भोसले, सुरेखा ठाकरे, उदयकुमार आहेर, शशिकांत तरंगे, वासिम बुर्‍हाण, विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष प्रशांत कदम, युवती प्रदेशाध्यक्षा संध्या सोनवणे आदींचा समावेश आहे.

काका आणि पुतण्या विधानसभेत आमनेसामने!

आता विधानसभा जाहीर होताच महायुतीकडून जरी युतीत अजित पवार गट लढत असला तरी शरद पवार सहानभूती घेवून जावू नये किंवा शरद पवार गटाला फायदा होवू नये यासाठी अजित पवार गट नीट योजना करताना दिसत आहेत. काका आणि पुतण्या विधानसभेत आमनेसामने असणार आहेत. याच दृष्टीने आता अजित पवार गट सावध पावले टाकताना दिसत आहे.