नागपूर : राज्यात एकीकडे दिवाळीची धामधूम सुरू झाली आहे. लाखो चाकरमान्यांना गावाचे वेध लागले आहे. अशातच नागपूरमध्ये रेल्वे अपघाताची बातमी समोर आली आहे. शालिमार एक्स्प्रेसचे एस टू आणि पार्सलचे दोन डबे ट्रॅकवरून खाली उतरले आहे. सुदैवाने या अपघातात कुठलीही जीवितहानी झालेली नाही.
दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार, शालिमार एक्स्प्रेसचे एस टू आणि पार्सलचे दोन डबे ट्रकवरून खाली उतरले आहे. कुर्ला- शालिमारकडे एक्स्प्रेस नागपुरातून जात असताना कळमना भागातून काही अंतरावर अचानक रेल्वेचे दोन डबे पटरीच्या खाली उतरले. यात एस टू आणि पार्सलचा एक डबा आहे. तसेच, कुर्ला-शालिमार एक्सप्रेस आज आपल्या निर्धारित वेळेत दुपारी १ वाजता नागपूर रेल्वे स्थानकात दाखल झाली होती. नागपूर रेल्वे स्थानकात सर्व आवश्यक तपासण्या केल्यानंतर गाडी गोंदियाच्या दिशेने निघाली असता, गाडी कळमना रेल्वे स्टेशन येथे दाखल झाली. त्यानंतर काही अंतर पुढे गेल्यानंतर अचानक रेल्वेचे दोन डबे हे रुळाच्या खाली उतरले.
रेल्वेचे वरिष्ठ डीसीएम यांची माहिती काय?
दक्षिण पूर्व मध्य रेल्वेचे वरिष्ठ डीसीएम दिलीप सिंह हे या घटनेची माहिती देत म्हणाले, नागपूरमधील कळमना रेल्वे स्थानकाजवळ रेल्वे क्रमांक १८०२९ सीएसएमटी शालीमार एक्स्प्रेसचे दोन डबे- एस २ आणि पार्सल व्हॅन रुळावरून घसरली. या घटनेत कोणीही जखमी झाले नाही. या ट्रेनमधील प्रवाशांना त्यांच्या इच्छित स्थळी नेण्यासाठी रेल्वे प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. तसेच, अपघाताबाबत रेल्वेकडून हेल्पलाइन सुरू करण्यात आली असून प्रवाशांना मूलभूत सुविधा पुरवल्या जात आहेत, अशी माहिती दिलीप सिंह यांनी दिली.
रेल्वे मार्ग पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरू!
घटनेच्या वेळी रेल्वेचा वेग कमी असल्याने दुर्घटनेची तीव्रता कमी होती. रेल्वे मार्ग पूर्ववत करण्यासाठी युद्ध पातळीवर रेल्वे प्रशासनाने काम सुरू केले. या दुर्घटनेमुळे हावडा मुंबई या मार्गावरील काही गाड्या प्रभावीत होण्याची शक्यता आहे. काही गाड्यांच्या मार्गात बदल केले जाऊ शकतात. दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू असून रेल्वे मार्ग पूर्ववत होण्यासाठी आणखी दोन ते तीन तासापेक्षा जास्त कालावधी लागण्याची शक्यता आहे.