नागपूर : विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Elections 2024) पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. एकीकडे महाविकास आघाडी आणि महायुतीत सामना रंगणार असून दुसरीकडे प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी तिसऱ्या आघाडीच्या माध्यमातून वेगळी चूल मांडल्याचे चित्र आहे. त्यातच बच्चू कडू यांनी परिवर्तन महाशक्तीची उमेदवार यादीबाबत भाष्य करत आज किंवा उद्या उमेदवारांची यादी येणार असल्याचे सुतोवाच केले आहे.
दरम्यान, माजी खासदार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी (Raju Shetty), स्वराज्य पक्षाचे संभाजीराजे छत्रपती आम्ही सगळे आज बसून बैठक घेणार आहोत. ज्या आमच्या मजबूत जागा आहेत ती यादी आम्ही आज किंवा उद्या जाहीर करणार आहोत. महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये काय बिघाडी होते यावर आम्ही लक्ष ठेवून आहोत. जवळपास १०० लोकांची सगळी यादी असेल. मग कोणताही मोठा नेता असेल तर त्या विरोधात आम्ही उमेदवार देणार, आम्हाला कसली भीती आणि बच्चू कडू कधीही भित नाही असे म्हणत बच्चू कडू यांनी तिसऱ्या आघाडीच्या यादी बद्दल भाष्य केले आहे.
नमेके काय म्हणाले बच्चू कडू?
केंद्रात सत्ता असताना नवखे कार्यकर्ते देणे ही भाजपची हार आहे. जे राम मंदिर चळवळमध्ये सहभागी झाले त्यामध्ये अनेकांचे परिवार बरबाद झाले. अशांना भाजप निवडून आणू शकत नाही, हे मोठे दुर्दैव आहे. सर्व देशात काँग्रेस मुक्त नारा भाजप देत आहे. मात्र बच्चू कडूच्या अचलपूर मध्ये काँग्रेसयुक्त अचलपूर असा एकंदरीत भाजपचा नारा असल्याची टीकाही बच्चू कडू यांनी केली आहे. अचलपूरनंतर बच्चू कडूने महाराष्ट्रात जे संघटन निर्माण केले आहे, त्यानंतर दोन्ही मोठ्या पक्षांना बच्चू कडू नको आहेत. म्हणूनच अचलपूरमध्ये भाजप काँग्रेस युती म्हणून लढणार आहे, अशीदेखील माहिती यावेळी बच्चू कडू यांनी दिली.
भाजप आपल्याच उमेदवाराला बकरा करू लागला!
मनोज जरांगे सोबत येणार की नाही तसेच जर सोबत नाही आले तर काय याबाबत कोणती भूमिका घ्यायची याची जबाबदारी संभाजीराजेंवर सोपविली असल्याचे कडू यांनी स्पष्ट केले. भाजप आपल्याच उमेदवाराला बकरा करू लागला अशी सध्या स्थिती आहे. अमरावती जिल्ह्यात भाजप ठेवायचीच नाही अशी राणा कुटुंबाने व्यवस्था केली आहे. प्रवीण तायडे हा नवा कार्यकर्ता आहे. अनेक गुन्हे दाखल झालेले जुने कार्यकर्त्यांना डावलून नव्या कार्यकर्त्याला तिकीट दिले आहे. केंद्रात सत्ता असताना नवखे कार्यकर्ते देणे ही भाजपची हार आहे. अचलपूरमध्ये भाजप आणि काँग्रेस एकत्र होऊन बच्चू कडू विरोधात लढणार आहे, असा दावा कडू यांनी केला आहे.
कार्यकर्त्यांची किंमत कोणालाच राहिलेली नाही!
सध्याचे राजकारण म्हणजे, कार्यकर्त्यांची किंमत लोकांना आणि पक्षांना कोणालाच राहिलेली नाही. त्यामुळे कार्यकर्ते बऱ्याचदा बोलतात की आपण एवढी मेहनत करतो, मात्र निवडणूक आली की जात-पात, धर्मपंथ, पैसा असे वेगळ्या पद्धतीने निवडला जातो, फार निवडक ठिकाणी कार्यकर्त्याचे काम ओळखून उमेदवारी दिली जाते. अशी खंतही बच्चू कडू यांनी बोलून दाखवली आहे.