गृहमंत्री अमित शाह यांच्याशी बंद दाराआड चर्चेनंतर मुख्यमंत्री शिंदेची प्रथमच प्रतिक्रिया, म्हणाले दोन दिवसांत….

मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास २२ ऑक्टोबरपासून सुरुवात होणार असून २९ ऑक्टोबर ही अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख असणार आहे. या पार्श्वभूमीवर सत्ताधारी महायुतीतील जागावाटपाचा तिढा सोडवण्यासाठी वेगवान हालचाली सुरू असून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकतीच दिल्लीत जाऊन भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी चर्चा केली. दिल्लीतील या बैठकीनंतर सदर नेत्यांमध्ये चंदीगड इथेही एक बैठक पार पडली. मात्र चंदीगडमध्ये शाह यांची राज्यातील तिन्ही नेत्यांसोबत बैठक झाल्यानंतर शाह यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्यासोबत बंद दाराआड स्वतंत्र चर्चा केल्याचे समजते.

दरम्यान, महायुतीमधील जागावाटपाबाबत गृहमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शाह यांच्याशी सकारात्मक चर्चा झाली असून याबाबतचा निर्णय़ अंतिम टप्प्यात आहे. पुढील एक दोन दिवसांत ३०-३५ जागांवरील निर्णय होईल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.

नेमके काय म्हणाले एकनाथ शिंदे?

जागावाटपाबाबत गरज पडली तर शहा यांच्याशी आम्ही पुन्हा चर्चा करू. आता तिढा राहिलेला नाही ३०-३५ जागांवरील निर्णय बाकी असून त्याचाही लवकरच अंतिम निर्णय होईल, असे शिंदे म्हणाले. राज्यात पुन्हा महायुतीचेच सरकार येणार असून आम्ही आता फक्त जिंकण्यासाठी काम करत आहोत. आमच्याकडे मुख्यमंत्रिपदावरुन वाद होत नसतात, असा टोला त्यांनी यावेळी विरोधकांना लगावला. तसेच, लोकशाहीत निवडणूक लढवण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे, या एका वाक्यात मुख्यमंत्र्यांनी मराठा नेते मनोज जरांगे यांच्याबाबतचा विषय संपवला.

‘लाडकी बहीण’ योजना बंद होणार नाही!

‘लाडकी बहीण’ योजना रद्द होणार नसल्याचा पुनरुच्चार शिंदे यांनी यावेळी केला. या योजनेला आम्ही आचारसंहितेमुळे ब्रेक लावलेला नाही. उलट ऑक्टोबरमध्ये नोव्हेंबरचे पैसे आगाऊ दिले आहेत. अॅडव्हान्समध्ये पैसे घेणारे नाही, तर अॅडव्हान्स पैसे देणारे हे सरकार आहे, असे ते म्हणाले. महायुती सरकारने किती शासन निर्णय काढले ते वाचा. किती रद्द केले ते वाचू नका. जीआर वेळेवर काढले आहेत. त्याचा फायदा आता मिळू लागला आहे, असेदेखील शिंदे यांनी नमूद केले.

कामाख्या देवीच्या दर्शनाचे निमंत्रण!

एकनाथ शिंदे दिल्लीत बोलताना म्हणाले की, महायुतीच्या बैठकीमध्ये सकारात्मक चर्चा झाली. एक-दोन दिवसांमध्ये अंतिम निर्णय घेतला जाईल. केवळ ३० ते ३५ जागांवर चर्चा बाकी आहे. जेवढ्या पायाभूत सुविधा संदर्भात प्रकल्प, विविध घटकांना स्पर्श करणाऱ्या कल्याणकारी योजना आमच्या सरकारने आणल्या, राबवल्या, तेवढ्या कोणत्याही सरकारने आणल्या नाहीत. तसेच आसामचे मुख्यमंत्री हेमंत विश्वा शर्मा यांनी कामाख्या देवीचे दर्शनाचे निमंत्रण दिले आहे, लवकरच देवीच्या दर्शनाला जाणार असल्याचेही ते म्हणाले.

जनतेच्या आशीर्वादामुळे सुखरूप!

शुक्रवारी मुख्यमंत्र्यांचे हेलिकॉप्टर सातारा जिल्ह्यात वादळामुळे इमर्जन्सी लँडिंग करावे लागले होते. यावर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, ढगाळ वातावरण आणि पावसामुळे हेलिकॉप्टर उतरवावे लागले. जनतेच्या आशीर्वादामुळे आणि प्रेमामुळे मी सुखरूप आहे.

महायुती मुख्यमंत्रीपदाचा चेहरा समोर करणार नाही!

महाविकास आघाडी प्रमाणेच महायुतीदेखील मुख्यमंत्री पदाचा चेहरा समोर करणार नसल्याचे समजते. एकनाथ शिंदे विद्यमान मुख्यमंत्री आहेत. देवेंद्र फडणवीस हे माजी मुख्यमंत्री आहेत. असे असतानाही महायुती मुख्यमंत्रीपदाचा चेहरा निवडणुकीत समोर करणार नाही. या संदर्भातील जो निर्णय असेल, त्यावर निवडणुकीनंतरच चर्चा करण्यात येणार आहे.