मविआतील वाद मिटले? संजय राऊत काय करतात यावर बोलू इच्छित नाही, पण… नाना पटोले यांचे स्पष्ट विधान काय?

मुंबई : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) आणि शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यातील वाद शुक्रवारी चव्हाट्यावर आला. सुरुवातीला संजय राऊत यांनी राज्यातील काँग्रेसचे नेतृत्व हे जागावाटपाच्या चर्चेसाठी सक्षम नसल्याचे म्हटले होते. यानंतर नाना पटोले यांनी संजय राऊत हे त्यांच्या पक्षश्रेष्ठींचे म्हणजेच उद्धव ठाकरेंचे (Uddhav Thackeray) ऐकत नसतील तर हा त्यांचा प्रश्न आहे, असे म्हणत नाराजी व्यक्त केली होती. मात्र आज संजय राऊत यांनी मी व्यक्तिगत कोणावरही टीका केलेली नाही, असे स्पष्टीकरण दिले. आता नाना पटोले यांनी यावर मिश्कील वक्तव्य केले आहे.

दरम्यान, आज पत्रकारांशी बोलताना नाना पटोले म्हणाले, संजय राऊत यांचे नेते उद्धव ठाकरे आहेत. आमचे नेते मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधी आहेत, आणि राष्ट्रवादीचे नेते शरद पवार आहेत. त्यामुळे आम्हालाही आमच्या नेत्यांशी बोलावे लागते. आमच्या नेत्यांसाठी वास्तविकता ही आमची जबाबदारी आहे. आणि आम्ही ते करत आहोत, संजय राऊत काय करतात, यावर आम्ही काहीही बोलू इच्छित नाही, असे पटोले स्पष्टपणे म्हणाले.

माझ्यात आणि संजय राऊत यांच्यात वाद नाही!

नाना पटोले म्हणाले की, माझ्यात आणि संजय राऊत यांच्यात वाद नाही. संजय राऊत काय बोलले हे तुम्ही ऐकले का सकाळी? त्यांनी स्पष्ट सांगितले की आमची अधिकृत भूमिका काही नाही. आम्ही काल निवडणूक आयोगाकडे तक्रार केली. त्याच्या संदर्भातल्या बातमीऐवजी ही बातमी गेली. खरेतर, हजारो मतदारांची मतदारयादीमधून नावे कमी करण्यात येत असल्याची बातमी चालवायला हवी होती, ती बातमी महत्त्वाची होती, मात्र तसे झाले नाही. लोकशाही वाचवणे ही चौथ्या स्तंभाचीही जबाबदारी आहे. महायुतीमध्येही मारामाऱ्या सुरू आहेत, चंद्रपूरमध्ये मारामाऱ्या झाल्या, संघाचे शिस्तबद्ध असलेल्या नागपूरमध्ये मारामाऱ्या झाल्या. त्या बातम्याही महत्त्वाच्या आहेत, असे नाना पटोले यांनी यावेळी सुनावले. तसेच, संजय राऊत यांनी काँग्रेसच्या सिस्टिमबाबत विधान केले होते. मी त्यांना आमची सिस्टिम समजावून सांगितली. आमच्या पक्षाचे हायकमांड असतात. हायकमांडला सगळी माहिती द्यावी लागते. शेवटी हायकमांड निर्णय घेतात. त्यामुळे सांगतोय, संजय राऊत आणि आमच्यामध्ये कुठलाही वाद नाही. तुम्हीच वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहात, असे नाना पटोले प्रसारमाध्यमांना उद्देशून म्हणाले.

महाराष्ट्रात माझे दोनच मित्र!

आमच्याकडे ३० ते ३५ जागांचा अजूनही निर्णय होणे अपेक्षित आहे. प्रत्येक पक्ष जास्तीत जास्त जागा मागण्यासाठी प्रयत्न करत असतो. मोठा भाऊ, छोटा भाऊ असे काही नाही. महाराष्ट्रात माझे दोनच मित्र आहेत. एक म्हणजे देवेंद्र फडणवीस आणि दुसरे संजय राऊत. ⁠आमच्यात कोणताही वाद नाही. तसेच, जागा वाटप अंतिम टप्प्यात आहे, अशीदेखील माहिती नाना पटोले यांनी दिली. महाराष्ट्रात महाराष्ट्रद्रोही भाजप सरकार बसलेले आहे. महाराष्ट्राला वाचवणे हा आमचा धर्म आहे, हे आम्ही अनेकदा सांगितले आहे. मात्र मेरिटच्या आधारावरच जागावाटप व्हावे, ही काँग्रेस पक्षाची भूमिका आहे, असेही नाना पटोले यांनी यावेळी स्पष्ट केले.

काय म्हणाले संजय राऊत?

संजय राऊत म्हणाले की, मी व्यक्तिगतरित्या कोणावरही मतप्रदर्शन केलेले नाही. तेवढी सभ्यता, सुसंस्कृतपणा आमच्यात आहे. प्रत्येक आघाडीत जागा वाटपाचा कुठेतरी अडथळा निर्माण होतो. भाजप-शिवसेना एकत्र होती तेव्हा देखील असे अडथळे होते. काँग्रेस हा एक खूप मोठा पक्ष आहे. आम्ही प्रादेशिक पक्ष आहोत. राष्ट्रीय पक्षांनी प्रादेशिक पक्षांना त्या त्या राज्यात स्थान दिले पाहिजे, ही आमची भूमिका आहे. प्रादेशिक पक्षांच्या जोरावरच सध्या राष्ट्रीय राजकारण सुरू आहे. मी यावर आता कुठलेही भाष्य करणार नाही. मी व्यक्तिगत कोणावरही टीका केलेली नाही. माझी भूमिका ही पक्षाची असते. उद्धव ठाकरे यांच्या परवानगीशिवाय मी कधीही काहीही बोलत नाही, असे ते म्हणाले आहेत.