महाविकास आघाडीत जागावाटपावरुन खडाजंगी; नाना पटोले असल्यास बैठकीला उपस्थित राहणार नाहीत, ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका काय?

मुंबई : राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने जागावाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात असतानाच आता महाविकास आघाडीत जागावाटपावरुन खडाजंगी होत असल्याचे स्पष्ट होत आहे. कारण, नाना पटोले यापुढे जागावाटपाच्या बैठकीत असल्यास शिवसेना ठाकरे गटाचे नेते जागा वाटपाच्या बैठकीला उपस्थित राहणार नाहीत, अशी भूमिका शिवसेना ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत जागावाटपावरुन वाद विकोपाला गेल्याचे पाहायला मिळतेय.

दरम्यान, महाविकास आघाडीमध्ये विदर्भातील वाढीव जागांसाठी ठाकरे गट आग्रही असताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विदर्भात जागा न सोडण्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे कालच्या बैठकीमध्ये संजय राऊत आणि नाना पटोले यांच्यामध्ये खटके उडाल्याची चर्चा आहे. जागा वाटपाची चर्चा पुढे जात नसल्याने शिवसेना ठाकरे गटाकडून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या भूमिकेविरोधात थेट काँग्रेस पक्षश्रेष्ठींकडे तक्रार करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

ठाकरेंच्या शिवसेनेचे नेमके म्हणणे काय?

महाविकास आघाडीमधले जागा वाटप हे नाना पटोलेंच्या आडमुठ्या भूमिकेमुळे अडचणीचे ठरत असल्याचे ठाकरेंच्या शिवसेनेचे म्हणणे आहे. दरम्यान आज सकाळी झालेल्या पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी राज्यातल्या काँग्रेस नेत्यांवर निशाणा साधला होता. महाराष्ट्रातले काँग्रेस नेते सक्षम नाहीत, ते यादी दिल्लीला पाठवतात, त्यानंतर चर्चा होते. आता वेळ निघून गेली आहे, असे वक्तव्य संजय राऊत यांनी केले होते. तसेच, आपले महाराष्ट्राचे काँग्रेस प्रभारी रमेश चेन्निथल्ला आणि मुकूल वासनिक यांच्याशी बोलणे झाले आहे आणि राहुल गांधींशी देखील आपण बोलणार असल्याचे संजय राऊत म्हणाले आहेत.

काँग्रेस हाय कमांडने तात्काळ निर्णय घ्यावे!

विधानसभा निडणुकांचे अर्ज भरण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक असताना या जागांवर लवकरात लवकर निर्णय व्हावा, असा प्रयत्न महाविकास आघाडी करत आहे. मात्र, नाना पटोले यांची भूमिका जागावाटप पूर्ण करत असताना अडचण निर्माण करणारी आहे, असे म्हणत ठाकरेंच्या नेत्यांनी काँग्रेस पक्ष श्रेष्ठींकडे हा विषय मांडला असल्याचे सुत्रांनी सांगितले आहे. तसेच काँग्रेस हाय कमांडने तात्काळ निर्णय घेऊन जागावाटप पूर्ण करावे, अशी ठाकरेंची मागणी आहे. त्यामुळे, आता पुढे काय होईल? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

नाना पटोलेंनी संजय राऊतांबद्दलची नाराजी केली उघड!

महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आज राज्य निवडणूक आयुक्त चोकलिंगम यांची भेट घेतली. त्यानंतर, शिवसेनेच्या शिवालय जनसंपर्क कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन नाना पटोलेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप केले. मात्र, मविआ नेत्यांची ही पत्रकार परिषद चर्चेत राहिली ती, नाना पटोले आणि संजय राऊत यांच्या विसंवादामुळे. संजय राऊत हे त्यांच्या पक्षश्रेष्ठींचे म्हणजेच उद्धव ठाकरेंचे ऐकत नसतील तर हा त्यांचा प्रश्न आहे, असे म्हणत नाना पटोले यांनी संजय राऊतांबद्दलची नाराजी उघड केली. त्यामुळे, पुन्हा एकदा महाविकास आघाडीतील बिघाडी चव्हाट्यावर आली असल्याचे समजते.