जनतेला मोफत पैसे वाटल्यास राज्य कंगाल होईल; राज ठाकरेंची राज्य सरकारवर टीका काय?

मुंबई : विधानसभा निवडणुकीची घोषणा होताच राज्यातील राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे. सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसत आहेत. महायुती सरकारच्या योजनांवरुन महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सत्ताधाऱ्यांना लक्ष्य केले आहे. महायुतीच्या नेत्यांकडूनही विरोधकांना जोरदार प्रत्युत्तर दिले जात आहे. आता यामध्ये महाराष्ट्र नवनिर्मान सेनेनेही सरकारी योजनांवर भाष्य करण्यास सुरुवात केली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लाडकी बहीण योजनेबाबत टीका केली आहे.

दरम्यान, राज ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा महत्त्वांकाक्षी योजना असलेल्या लाडकी बहिण योजनेबाबत खळबळजनक दावा देखील केलाय. “लोकांना मोफत पैसे वाटल्यास राज्य कंगाल होईल” असे भाकीत राज ठाकरेंनी केले आहे.

काय म्हणाले राज ठाकरे?

यंदाची विधानसभा निवडणूक मनसे स्वबळावर लढणार आहे. निवडणुका लढवून जिंकण्याचा आणि सरकार बनवण्याचा निर्धार असल्याचे ते म्हणाले आहेत. दरम्यान, मुंबईत झालेल्या बैठकीत महायुतीला पाठिंबा, टोलमाफी आणि सरकारच्या महत्वाकांक्षी लाडकी बहीण योजनेबाबत राज ठाकरे म्हणाले, टोलमाफी करण्याची मागणी आमचीच होती. तसेच, राज्य सरकारचे कुठल्याही योजनेवरून असे फुकट पैसे वाटणे ही योग्य नाही, अशी टीका यावेळी राज ठाकरेंनी केली.

यापुढे सरकार पैसे वाटू शकत नाही!

पुढे बोलताना राज ठाकरे म्हणाले, मी मागे माझ्या सभेत बोललो होतो अशाप्रकारे लोकांना मोफत पैसे वाटणे योग्य नाही. तुम्ही ५ हजार, ७ हजार वाटत आहात. सरकार असे करू शकत नाही. ते तुमच्या घरचे पैसे आहेत का? हे सरकारचे पैसे आहेत. सरकारकडे तिजोरीत पैसे नाही. लाडकी बहीण योजनेचा आता जो हफ्ता मिळाला आहे, तो शेवटचा हफ्ता असेल. यापुढे सरकार पैसे वाटू शकत नाही. कारण सरकारकडे पैसेच नाही. आता ते असे पैसे वाटू शकत नाहीत. राज्य कंगाल होईल, असा इशाराही जनतेला राज ठाकरे यांनी दिला.

विरोधकांनीही केले लक्ष्य!

विरोधकांनीही महायुती सरकारला लाडकी बहीण योजनेवरुन लक्ष्य केले आहे. मात्र राज्यातील दीड कोटी पेक्षा जास्त महिलांना लाडक्या बहीण योजनेचा लाभ मिळतोय. या योजनेला महिला आणि मुलींचा भरघोस प्रतिसाद देखील मिळताना दिसतोय. तेव्हा हाच प्रतिसाद महायुतीला मतांच्या रुपाने मिळेल का? हे पाहणे देखील आता महत्त्वाचे ठरणार आहे.