मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत नुकताच महिलांच्या खात्यात चौथा हप्ता जमा झाला होता. या चौथ्या हप्त्यात महिलांच्या खात्यात ऑक्टोंबर आणि नोव्हेंबरचा असा एकत्रितपणे ३००० रूपयाचा निधी महिलांच्या खात्यात जमा झाला होता. त्यामुळे लाडक्या बहिणींना दिवाळीआधीच भाऊबीजची भेट दिली होती. या भेटीनंतर आता सरकार आणखी २५०० रूपये काही महिलांच्या खात्यात जमा करणार आहे. त्यामुळे महिलांची दिवाळी आणखी गोड होणार आहे. तसेच, महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा झाली असून, राज्यात आचारसंहिता (Code of Conduct) लागू झाली आहे.
दरम्यान, अशातच आता निवडणुकीनंतर राज्यातील महिलांना लाडकी बहीण योजनेचे (Ladki Bahin Yojna) पैसे मिळणार की नाही? याची चिंता लागली आहे. पात्र महिलांना हफ्त्यांसह दिवाळीचा बोनसही मिळाला आहे. पण आता निवडणुका लागल्याने योजनेचे काय होणार? अशी चिंता महिलांना सतावत असतानाच उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी यावर भाष्य केले आहे. महायुतीच्या पत्रकार परिषदेत त्यांनी लाडकी बहीण योजनेबाबत सांगितले.
अजित पवार काय म्हणाले?
जनतेच्या जीवन बदलणाऱ्या योजना आम्ही दिल्या आहेत. आमच्या योजनांचा मिळणारा प्रतिसाद पाहून विरोधक गडबडले आहेत. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या यशामुळे ते गडबडून गेलेत. ज्यावेळी आम्ही लाडकी योजनेची घोषणा केली तेव्हा या योजनेची अंमलबजावणी होणार नाही, फॉर्म भरले जातील पैसे मिळणार नाही अशी टीका विरोधकांनी केली. मात्र अडीच कोटी महिलांच्या खात्यामध्ये गेल्या पाच महिन्यांपासून पैसे जमा होत असल्याचे त्यांनी सांगितले.
या योजना तात्पुरत्या नाही!
विरोधकांना आमच्या बहिणींच्या आयुष्यात होत असलेला सकारात्मक बदल पचनी पडत नसल्याने हे पैसे निवडणूक होईपर्यंतच मिळतील असे सांगत आहेत. पण मी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या साक्षीने जबाबदारीने सांगतो की, यामध्ये पहिल्यांदा १० हजार कोटींची, नंतर ३५ हजार कोटींची तरतूद केली होती. अशा प्रकारे ४५ हजार कोटींची वर्षभराची तरतूद केली आहे. त्यामुळे लाडकी बहिण योजना तात्पुरती नाही याची खात्री मला सर्व महिलांना द्यायची आहे, असे अजित पवारांनी स्पष्ट केले.
गरीब महिलांना न्याय देण्याचा प्रयत्न!
निवडणुकीपूर्वीच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत बरेच निर्णय होतात. त्याचे काही कारण देता येत नाही. सरकार राहिलेले सर्व निर्णय या काळात वेगाने घेते. पण आम्ही सर्व योजना विचारपूर्वक सुरु केल्या आहेत. अर्थसंकल्पात योजनांची घोषणा केल्यानंतर विरोधकांनी त्याची टिंगलटवाळी केली. आमची मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना लोकप्रिय झाली. आम्ही या माध्यमातून गरीब महिलांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. यावरुन विरोधक सुरुवातीला पैसे येणार नाहीत, असा प्रचार करत होते. नंतर म्हणाले आलेले पैसे काढून घ्या, अन्यथा सरकार परत काढून घेईल. विरोधकांना आरोप-प्रत्यारोपाचा अधिकार आहे. पण हे करताना विरोधकांनी थोडफार तारतम्य बाळगले पाहिजे, असे अजित पवार यांनी म्हटले.
लाडकी बहिणीचे पैसे कोणीही काढून घेऊ शकत नाही!
पुढे बोलताना अजित पवार म्हणाले, निवडणुका येतील, जातील. हे दर पाच वर्षांनी ठरले आहे. पण हे पैसे तुमचा अधिकार आहे, तो कोणीही काढून घेऊ शकत नाही. याउलट भविष्यात योजनेच्या माध्यमातून दिल्या जाणाऱ्या मदतीत आणखी वाढ करण्याचा सूतोवाच मुख्यमंत्र्यांनी केलेला आहे. आम्ही ही योजना फार विचारपूर्वक मांडली असून, आता यशस्वीपणे तिची अंमलबजावणी करत आहोत, असेदेखील अजित पवारांनी सांगितले.