नागपूर : नागपुरात सामाजिक कार्यकर्ते श्याम मानव यांच्या कार्यक्रमामध्ये गोंधळ घालण्यात आला आहे. भाजप युवा मोर्चा आक्रमक झाला असून त्यांनी श्याम मानव यांच्या कार्यक्रमात गोंधळ घातला. भाजप युवा मोर्चाचे लोक मोठ्या संख्येने श्याम मानव यांच्या कार्यक्रमात घुसले. केवळ राजकारण केले जात आहे, राजकीय मुद्दे मांडून काँग्रेसला समर्थन देण्यासाठी ही सभा घेतली जात असल्याचे भाजप युवा मोर्चाने म्हटले. तसेच, अंधश्रद्धेचा या सभेशी काहीही संबंध नसल्याचा आरोप भाजप युवा मोर्चाने केला.
दरम्यान, संपूर्ण गोंधळादरम्यान श्याम मानव स्टेजवर बसलेले होते. श्याम मानव यांचे भाषण ऐकण्यासाठी आलेल्या लोकांनीही भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांना विरोध करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे मोठा गोंधळ कार्यक्रमात निर्माण झाला, असल्याचे समजते.
भाजप युवा मोर्चातील लोकांचा प्रचंड गोंधळ!
गोंधळादरम्यान एकीकडे स्टेजवर श्याम मानव काही कार्यक्रत्यांसोबत दिसत होते. दुसरीकडे स्टेजखाली भाजप युवा मोर्चाच्या लोकांनी प्रचंड गोंधळ घातल्याचे दृष्य पाहायला मिळाले. श्याम मानव यांच्या भाषणाआधीच भाजप युवा कार्यकर्त्यांनी गोंधळ घालत घोषणाबाजी केली. पोलिसांनी मध्यस्थी करत भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला. तसेच, पोलिसांकडून गोंधळ घालणाऱ्या कार्यकर्त्यांना बाहेर काढण्याचाही प्रयत्न केला जात होता.
श्याम मानव काय म्हणाले?
ज्या नागपूरमध्ये वेगवेगळ्या विचारधारेचे लोक एकत्र राहतात, जाहीरपणे एका कार्यक्रमात येऊन वेगवेगळी मते मांडतात, त्या नागपुरातूनच हे संविधान संपत असल्याची परिस्थिती झाली आहे. मला अशा घटनांची सवय आहे. मला काहीही झालेले नाही. मी सुरक्षित आहे, असे श्याम मानव यांनी सांगितले.
लोकशाही बुडवणारे लोक!
पुढे सांगताना श्याम मानव म्हणाले, विषय तसाच आहे, संविधान बचाव आणि महाराष्ट्र बचाव. आमचा वक्ता बोलत असताना मध्येच गोंधळ घालणे म्हणजे ही फक्त अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा नाही तर लोकशाहीवरची गदा आहे. आचारसंहिता घोषित झाल्यानंतर हे अशाप्रकारे वागत असतील तर हे किती संविधान वाचवणारे आणि लोकशाही बुडवणारे लोक आहेत, याचा उत्कृष्ट पुरावा ते लोकांसमोर देत आहेत. संविधान बचाव आणि महाराष्ट्र बचाव हाच विषय आहे आणि याचा पुरावा त्यांनी दिलेला आहे, अशी टीका देखील यावेळी श्याम मानव यांनी केली.