ऐन निवडणुकीत भाजपने केली ‘या’ नेत्याची हकालपट्टी; प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंचा थेट इशारा, म्हणाले बंडखोरांना….

नागपूर : महायुतीमध्ये जागा वाटपावरून खटके उडत आहेत. भाजपचे कार्यकर्ते शिवसेना आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला स्वीकारण्यास तयार नसल्याचे दिसत आहे. यातच शिवसेनेने रामटेक विधानसभा मतदारसंघाचा उमेदवार आधीच जाहीर केल्याने भाजपमध्ये मोठा वाद उफाळून आला आहे. तसेच, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंगळवारी रात्री नागपुरात आल्यानंतर माध्यमांशी बोलताना आगामी निवडणुकीत पक्षविरोधी वागणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराच बंडखोरांना दिला आहे.

दरम्यान, यास जाहीर विरोध करणारे आणि बंडाचा इशारा देणारे रामटेक विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार मल्लिकार्जुन रेड्डी यांना भाजपातून तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी या माध्यमातून बंडखोरांचा चांगलाच समाचार घेतला असल्याचे समजते.

पदाधिकाऱ्यांमुळे पक्ष अडचणीत होता!

मागील काही काळापासून पक्षातील वाचाळवीरांमुळे महायुतीत दरी निर्माण होते की काय? असे चित्र निर्माण झाले होते. राज्यातील विविध भागांमध्ये अशा वाचाळ पदाधिकाऱ्यांमुळे पक्ष अडचणीत येत असल्यामुळे मागील महिन्यातच बावनकुळे यांनी बंडखोरांना थेट इशारा दिला होता. परंतु, काही जणांनी तशीच भूमिका ठेवली आणि म्हणूनच पक्षाच्या धोरणांविरोधात भूमिका घेतल्यामुळे रेड्डी यांना सहा वर्षांसाठी निलंबित करण्यात आले. तसेच, केवळ रेड्डींवरच कारवाई थांबणार नाही, अशी माहिती बावनकुळे यांनी दिली.

जो नेता बंड पुकारेल त्याविरोधात कारवाई!

बावनकुळे यांनी सांगितले की, पक्षाने काही कठोर निर्णय घेतले आहे. पक्षविरोधी कारवाया करणे, पक्षाच्या अंतर्गत विषयाला सार्वजनिकपणे बोलत पक्षशिस्तीचे उल्लंघन करणे असे प्रकार काही जणांकडून करण्यात आले. पुढील काळात महायुतीविरोधात जो नेता किंवा कार्यकर्ता जाहीर बोलेल किंवा बंड पुकारेल त्याविरोधात नक्कीच कारवाई होईल. पक्षाच्या मंचावर निश्चित प्रत्येकाला नाराजी मांडता येईल, मात्र सार्वजनिकपणे पक्षविरोधी भूमिका मान्य करण्यात येणार नाही, असे बावनकुळे त्यांनी स्पष्ट केले.

विरोधी पक्षांकडून सरड्यासारखा रंग बदलण्यात आला!

निवडणूक आयोगाविरोधात बोलण्याचा मुद्दाच नाही. विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यावर विरोधी पक्षांकडून सरड्यासारखा रंग बदलण्यात आला आहे. ते एकाच टप्प्यात निवडणूक का आहे? असा प्रश्न निर्माण करत आहेत. मात्र लोकसभेत सात टप्प्यात निवडणूक झाली तेव्हादेखील त्यांनी टीका केली होती व आता महाराष्ट्रात एकाच टप्प्यात निवडणूक होत असताना ते परत निवडणूक आयोगाविरोधात बोलत आहेत. त्यांना निवडणूकीत पराभव दिसतो आहे. त्यामुळे ते असा प्रकार करत आहेत, असेदेखील बावनकुळे म्हणाले.

मल्लिकार्जुन रेड्डी यांचा पक्षाला इशारा काय?

भाजपमधून सहा वर्षासाठी निलंबन झालेल्या माजी आमदार मल्लिकार्जुन रेड्डी हे पक्षाला इशारा देत म्हणाले, आता रामबाण निघाला आहे, आता तो थांबणार नाही. विधानसभा निवडणुकीच्या निकालातून हे नक्कीच स्पष्ट होईल, असे ते म्हणाले. दरम्यान, मल्लिकार्जुन रेड्डी यांनी रामटेकमधून बंडखोरी करणार असल्याची भूमिका व्यक्त केली आहे. पक्षाने त्यांना सहा वर्षासाठी निलंबित केले ही माहिती समजल्यानंतर काही कार्यकर्ते व स्थानिक पत्रकार जेव्हा मल्लिकार्जुन रेड्डी यांना भेटायला गेले, तेव्हा ते म्हणाले, मी कोणत्याही स्थितीत कॉम्प्रमाइज करणार नाही, २० वर्षांपासून आशिष जैस्वाल कोणाची तरी मदत घेऊन निवडणूक जिंकत आला आहे, त्याच्यामुळे रामटेकमध्ये भाजप संपत चालली आहे, असा आरोपही मल्लिकार्जुन रेड्डी यांनी यावेळी केला.