महाराष्ट्र : विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झालेला आहे. राज्यात एकाच टप्प्यात निवडणूक संपन्न होईल. २० नोव्हेंबरला मतदान होणार असून २३ नोव्हेंबरला निकाल जाहीर होईल. केंद्रीय निवडणूक आयोगाने विज्ञान भवनात पत्रकार परिषद घेत महाराष्ट्र, झारखंड विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. यावेळी त्यांनी ईव्हीएम बद्दलच्या सगळ्या प्रश्नांचेही उत्तरे दिली.
दरम्यान, लेबनॉनमधील दहशतवादी संघटना हेजबुल्लाहच्या शेकडो सदस्यांच्या पेजरचे स्फोट झाल्याची घटना गेल्याच महिन्यात घडली. या सगळ्यामागे इस्रायल असल्याचे बोलले गेले. पेजर यंत्रणा हॅक करुन ही घातपाती कारवाई करण्यात आली. त्यानंतर ईव्हीएमच्या हॅकिंगबद्दल प्रश्न विचारले गेले. या प्रश्नाला निवडणूक आयोगाचे आयुक्त राजीव कुमार यांनी उत्तर दिले असल्याचे समजते.
पेजर हॅक होऊ शकते, तर मग ईव्हीएम का नाही?
मुख्य निवडणूक आयुक्तांनी यावेळी पेजर हॅकची ईव्हीएमशी केल्या जाणाऱ्या तुलनेवरही उत्तर दिले. त्यांनी सांगितले की, पेजर बॅटरीशी जोडलेला असतो, पण ईव्हीएम नाही. राजीव कुमार म्हणाले की, “काही लोक तर असेही म्हणतात की, जर पेजरचा स्फोट घडवला जाऊ शकतो तर मग ईव्हीएम हॅक का केले जाऊ शकत नाही? अशा लोकांनी समजून घेणे गरजेचे आहे की, पेजर कनेक्टेड असतो, पण ईव्हीएम नाही”. निवडणुकीच्या आधी पोलिंग एजंट्सच्या उपस्थितीत त्यात काही छेडछाड तर करण्यात आलेली नाही ना याची तपासणी केली जात असल्याचेही त्यांनी सांगितले.
ईव्हीएमची संपूर्ण यंत्रणा सुरक्षित!
आम्ही ईव्हीएमवरील सर्व २० तक्रारींना व्यक्तिगतपणे वस्तुस्थितीनुसार उत्तर देऊ. ईव्हीएमची संपूर्ण यंत्रणा सुरक्षित असल्याचे राजीव कुमार म्हणाले. तसेच, प्रत्येक टप्प्यावर राजकीय पक्षांचे एजंट हजर असतात. ईव्हीएममध्ये बॅटरी टाकल्यावर त्यावर एजंटची सहीही असते. मतदानाच्या ५ ते ६ दिवस आधी चिन्ह लावली जातात. मशीन तसेच बॅटरीवरही एजंटची सही असते आणि ती सील केलेली असते, अशीदेखील माहिती त्यांनी दिली.
ईव्हीएमशी छेडछाड शक्य नाही!
मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले की, ईव्हीएमशी छेडछाड शक्य नाही. ईव्हीएमबाबत यापूर्वीही प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. हॅकिंग होऊ शकते, इथले मतदान तिकडे जाऊ शकते, असे आधी म्हटले जात होते. मात्र, आता पुढे काय म्हटले जाणार, याचाही विचार आम्ही करत आहोत, असेही मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार म्हणाले.