नागपूर : राज्य परिवहन महामंडळाकडून दर वर्षी दिवाळीत १० टक्के हंगामी भाडेवाढ केली जाते. दिवाळीतील प्रवाशांची गर्दी लक्षात घेता तसेच एसटीचे महसूल वाढवण्यासाठी दरवर्षी एसटी महामंडळाकडून दिवाळीच्या कालावधीत १० टक्के हंगामी भाडेवाढ केली जाते. मात्र यंदा दिवाळीनिमित्त एसटी महामंडळाकडून दरवर्षी केली जाणारी हंगामी भाडेवाढ रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
दरम्यान, यंदा देखील २५ ऑक्टोबर ते २४ नोव्हेंबर दरम्यान तब्बल एका महिन्यासाठी १० टक्के भाडेवाढ लागू करण्यात आली होती. मात्र, प्रवाशांना दिलासा देत एसटी महामंडळाने भाडेवाढ रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे राज्यातील नियमित प्रवाशांना तसेच दिवाळीच्या सुट्ट्यांनिमित्त प्रवास करणाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
सर्वाधिक फायदा एसटी प्रशासनाला…
दिवाळीच्या काळात मोठ्या प्रमाणात प्रवाशांची वाहतूक सुरु असते. त्याचा सर्वाधिक फायदा हा एसटी प्रशासनाला होतो. कारणी खासगी वाहतूकीचे दर हे सर्वसामान्यांना परवडवणारे नसतात. त्यामुळे प्रवासी एसटीचा पर्याय स्विकारतात. मात्र एसटी प्रवाशाने दिवाळी दरम्यान, १० टक्के हंगामी भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र यावेळी एसटी प्रशासनाने या निर्यणाला स्थगिती दिली आहे. तसेच, एसटी प्रशासनाने यासंदर्भातील परिपत्रक देखील काढले होते. मात्र ही हंगामी भाडेवाढ करण्याच्या निर्णय एसटी महामंडळाने रद्द केला आहे.
एसटी प्रशासनाने जारी केले परिपत्रक…
२५ ऑक्टोबर ते २४ नोव्हेंबर दरम्यान १० टक्के हंगामी भाडेवाढीसंदर्भातील परिपत्रक जारी करण्यात आले होते. एसटीची प्रस्तावित १० टक्के भाडेवाढ विठाई, शिवशाही, निमआराम बसेससाठी लागू होती. मात्र, ती भाडेवाढ रद्द करण्यात आली आहे. मुंबई-पुणे मार्गावर शिवनेरीसाठी हंगामी भाडेवाढ लागू नव्हती. दरम्यान, एसटी महामंडळाला नियमित फेऱ्यांमध्ये सध्या दिवसाला सुमारे २३ ते २४ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळते. दिवाळीतील हंगामी भाडेवाढीमुळे दिवसाचे उत्पत्र ६ कोटी रुपयांनी वाढण्याची शक्यता होती. त्यामुळे महिन्याभरात महामंडळाला जवळपास ९५० ते एक हजार कोटी रुपयांचा महसूल मिळण्याची अपेक्षा होती. मात्र महामंडळाच्या निर्णयाने एसटीला या महसुलाला आता मुकावे लागणार आहे.
प्रवाशांना दिलासा…
दिवाळीच्या काळात व दिवाळीनंतर काही दिवस नागरिकांच्या प्रवास होत असतो. मात्र १० टक्के हंगामी भाडेवाढ केल्याने प्रवाशांना आर्थिक फटका सहन करावा लागतो. मात्र, यंदा एसटीच्या निर्णयामुळे प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.