माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांच्या हत्येची जबाबदारी लॉरेन्स बिष्णोई गँगने स्वीकारली आहे. बिष्णोई गँगने याआधी अभिनेता सलमान खानलाही जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्यामुळे सलमानच्या चाहत्यांनी चिंता व्यक्त केली आहे. आता माजी राज्यसभा खासदार आणि भाजप नेते हरनाथ सिंह यादव यांनी अभिनेता सलमान खानला बिश्नोई समाजाची माफी मागावी, असा सल्ला दिला आहे. सोशल मीडिया अकाऊंटवरून यादव यांनी इशारा दिला असल्याचे समजते.
दरम्यान, माजी मंत्री, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दिकी यांची मुंबईत गोळ्या घालून हत्या करण्यात आली. त्यानंतर एकच घबराट पसरली आहे. सलमान खानशी जवळीक असल्याने बाबा सिद्दिकी यांची हत्या झाल्याचे समोर आले असून, बिश्नोई गँगकडून शेअर करण्यात आलेल्या फेसबुक पोस्टमध्ये देखील त्याचा उल्लेख होता. त्यानंतर आता सलमान खानने बिश्नोई समाजाची माफी मागावी, अशी मागणी हरनाथ सिंह यादव यांनी केली.
हरनाथ सिंह यादव यांचे ट्विट काय?
प्रिय सलमान खान, काळवीटाला देव मानतात, त्याची पूजा करतात. तू त्याची शिकार केलीस. इतकेच नव्हे तर तू ते शिजवून खाललेस. यामुळे बिश्नोई समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या. बऱ्याच काळापासून तुझ्यावर बिश्नोई समाजाचा रोष आहे. तसेच, माणसाकडून चुका होतात. तू मोठा अभिनेता आहे. देशातील अनेक लोक तुला मानतात. तुझ्यावर प्रेम करतात. माझी तुला विनंती आहे की बिश्नोई समाजाच्या भावनांचा तू आदर करावा. तुझ्याकडून झालेल्या चुकीसाठी तू बिश्नोई समाजाची माफी मागावी, असा सल्ला त्यांनी सलमानला दिलेला आहे.
काय आहे काळवीट प्रकरण ?
१९९८ मध्ये जोधपूर येथे ‘हम साथ साथ है’ या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान सलमान खान त्याच्या सहकलाकारांसोबत शिकार करण्यासाठी गेला होता. साधारण २७ ते २८ सप्टेंबरच्या वेळेस त्याने तेथील घोडा फार्म हाउस येथे काळवीटाची शिकार केली होती. या संदर्भात अभिनेत्याविरोधात खटला दाखल करण्यात आला. तसेच, या काळवीट प्रकरणात बाबा सिद्दीकींनी सलमान खानला मदत केल्याचेही समोर आले होते. सलमानला २०१८ मध्ये काळवीट शिकार प्रकरणात ५ वर्षांची शिक्षा झाली होती. मात्र, ५० हजारांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर त्याची जामिनावर सुटका करण्यात आली.