राज्य सरकारचा धडाका; मंत्रिमंडळ बैठकीत घेतले १९ महत्वाचे निर्णय, मुंबई टोलमुक्त!

मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या आधी महायुती सरकाने निर्णयांचा सपाटा चालवला आहे. आचारसंहिता लागण्याआधीच झालेल्या शेवटच्या मंत्रिमंडळ बैठकीत अनेक मोठे निर्णय घेण्यात आले. मुंबईच्या प्रवेशद्वारावरील पाच टोलनाक्यावर हलक्या वाहनांना टोलमाफी करण्यात आली आहे. तसेच, आणखी एका महामंडळाची स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याशिवाय पुणे मेट्रो रेल टप्पा-२ संदर्भातही मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे.

दरम्यान, वाशी, मुलुंड पूर्व-पश्चिम, ऐरोली, दहीसर हे मुंबईतील टोलनाके आहेत. या टोलनाक्यांवरून जाताना लहान वाहनांवर टोलचा भार होता. परंतु, आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकारने लहान वाहनांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. आज रात्रीपासून लहान वाहनांकडून या पाचही टोलनाक्यांवरून टोल घेतला जाणार नाही. याच संदर्भात, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह इथे राज्य मंत्रिमंडळाची बैठक घेण्यात आली. या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील इतर सदस्यही उपस्थित होते.

हलक्या वाहनांसाठी टोल माफी!

मंत्रिमंडळ बैठकीत अनेक निर्णय घेण्यात आले असून, यात सार्वजनिक बांधकाम विभागाने मुंबईच्या ५ प्रवेश मार्गांवरील टोल नाक्यांवर हलक्या वाहनांसाठी टोल माफीचा निर्णय घेतला आहे. ज्याची अंमलबजावणी आज रात्री १२ पासून सुरू होईल.

आजच्या मंत्रिमंडळ बैठकीतील महत्त्वाचे निर्णय काय?

१) मुंबईतल्या ५ प्रवेश मार्गांवरील पथकर (टोल) हलक्या वाहनांसाठी माफ. आज रात्री १२ वाजेपासून अंमलबजावणी.

२) आगरी समाजासाठी महामंडळ

३) समाजकार्य महाविद्यालयांमधील अध्यापकांना करिअर ॲडव्हान्समेंट स्किम

४) दमणगंगा एकदरे गोदावरी नदी जोड योजनेस मान्यता

५) आष्टी उपसा सिंचन योजनेस सुधारित मान्यता

६) वैजापूरच्या शनीदेवगाव बंधाऱ्यास प्रशासकीय मान्यता

७) राज्य शेती महामंडळाची जमीन एमआयडीसीला हस्तांतरित

८) पाचपाखाडी येथील जमीन ठाणे मनपास प्रशासकीय भवनासाठी

९) खिडकाळी येथील जमीन हायब्रिड स्किल विद्यापीठासाठी विनामूल्य

१०) राज्यात प्रधानमंत्री आवास योजना (शहरी ) २.० राबविणार

११) पुणे मेट्रो रेल टप्पा-२ मधील रेल्वे मार्गिंकांच्या कामांना मान्यता

१२) किल्लारीच्या शेतकरी सहकारी कारखान्याचे कर्ज व्याजासह माफ

१३) अडचणीतील सहकारी उपसा जलसिंचन योजनांचे थकीत कर्ज माफ

१४) मिरजच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात इमर्जन्सी मेडिसिनची ३ पदे

१५) खंड क्षमापित झालेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना जुनी पेन्शन योजना

१६) मराठी भाषेविषयक जनजागृतीसाठी पंधरवडा

१७) अण्णासाहेब जावळे मराठवाडा विकास मंडळ अभ्यासगट

१८) ‘उमेद’साठी अभ्यासगट

१९) कौशल्य विद्यापीठास रतन टाटा यांचे नाव