बाबा सिद्दीकी यांच्या हत्येवर राहुल गांधींची संतप्त प्रतिक्रिया; म्हणाले महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे कोलमडली!

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाबा सिद्दिकी यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. या गोळीबारप्रकरणी करनैल सिंह आणि धर्मराज कश्यप या दोन मुख्य आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. सध्या याप्रकरणी गुन्हे शाखा अलर्ट मोडवर आली असून फरार आरोपीच्या शोध घेण्यासाठी पाच ते सहा पथक तयार करण्यात आली आहेत.

दरम्यान, याप्रकरणी आता राज्यासह देशभरातील राजकारण्याची प्रतिक्रिया समोर येत आहेत. अशातच आता लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी बाबा सिद्दिकी यांच्या हत्येवर प्रतिक्रिया दिली आहे. सरकारने बाबा सिद्दिकी यांच्या हत्येची जबाबदारी स्विकारावी, असे राहुल गांधी यांनी असून राहुल गांधी यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून बाबा सिद्दिकी यांच्या हत्येवर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाले राहुल गांधी?

बाबा सिद्दीकीजी यांचे निधन धक्कादायक आणि दुःखदायक आहे. या कठीण काळात माझ्या संवेदना त्यांच्या कुटुंबासोबत आहेत. या भीषण घटनेने महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे कोलमडली असल्याचे दिसून येत आहे. सरकारने याची जबाबदारी स्वीकारली पाहिजे आणि त्यांना न्याय मिळाला पाहिजे, असे राहुल गांधी यांनी म्हणाले आहेत.

नेमका गोळीबार कसा झाला?

शनिवारी (१२ ऑक्टोबर) रात्रीच्या सुमारास ही गोळीबाराची घटना घडली. बाबा सिद्दिकांचे पूत्र झिशान सिद्दिकी यांच्या कार्यालयासमोर बाबा सिद्दिकी यांच्यावर तीन व्यक्तींनी गोळीबार केला. या प्रकरणात दोघांना ताब्यात घेण्यात आले असून या प्रकरणातील तिसऱ्या आरोपीची ओळख पोलिसांना पटल्याची माहिती समोर येत आहे. करनैल सिंह आणि धर्मराज कश्यप अशी ताब्यात घेण्यात आलेल्या दोन आरोपींची नावे आहेत. तर तिसऱ्या आरोपीचा पोलीस शोध घेत असून, त्याच्या तपासासाठी जवळपास पाच ते सहा पथक गुन्हे शाखेकडून तयार करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.