मुंबई : अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी यांच्यावर वांद्र्यात गोळीबाराची घटना काल रात्री घडली होती. या गोळीबारात त्यांची हत्या झाल्याची माहिती समोर आली. बाईकवरून आलेल्या हल्लेखोरांनी बाबा सिद्दीकींवर (Baba Siddique Dead) गोळीबार केला. या गोळीबारात बाबा सिद्दीकी गंभीररित्या जखमी झाले होते. या घटनेनंतर सिद्दीकींना तत्काळ लिलावती रूग्णालयात (Lilavati Hospital) दाखलही करण्यात आले होते, मात्र उपचाराआधीच त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली.
दरम्यान, बाबा सिद्दीकी आपल्या कार्यालयातून बाहेर पडले होते. त्यानंतर गाडीत बसत असतानाच दुचाकीवरून आलेल्या तिघांनी त्यांच्यावर बेछूट गोळीबार केला. या हल्लेखोरांनी सिद्दीकींच्या छातीवर दोन ते तीन राऊंड फायर केले होते. यातली एक गोळी बाबा सिद्दीकींच्या छातीला लागली. मात्र आता अशी माहिती समोर आली आहे की, मुंबई पोलीस सूत्रांनुसार बाबा सिद्दीकींवर हल्ला करण्यापूर्वी तिन्ही आरोपी रिक्षाने घटनास्थळी पोहोचले होते.
बिश्नोई गँगचे आरोपी!
मुंबई पोलीस सूत्रांनुसार बाबा सिद्दीकींवर हल्ला करण्यापूर्वी तिन्ही आरोपी रिक्षाने घटनास्थळी पोहोचले होते. बाबा सिद्दीकी येण्याची ते वाट पाहत होते. आरोपी गेल्या २५-३० दिवसांपासून त्या भागाची रेकी करत होते. क्राईम ब्रांचला आरोपींनी ते बिश्नोई गँगचे असल्याचे सांगितले आहे. गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईने सलमान खानला देखील संपविण्याचा प्रयत्न केला आहे. सिद्दीकी हे सलमान खान, शाहरुख खान यांचे जवळचे संबंध होते. आरोपींमध्ये एक हरियाणाचा करनैल सिंह आणि दुसरा उत्तर प्रदेशचा धर्मराज कश्यप आहे. या तिघा हल्लेखोरांना बाबा सिद्दीकींच्या जवळचा असलेल्या व्यक्तीकडून माहिती मिळत होती, असा संशय पोलिसांना आहे. हा व्यक्ती बाबा सिद्दीकी कुठे आहेत, किती वाजता येणार आहेत आदी माहिती देत होता. त्यामुळे पोलीस आता या प्रकरणाची सखोल चौकशी करत असल्याचे समजते. दरम्यान, या प्रकरणात उपस्थित कार्यकर्त्यांनी तीन हल्लेखोरांपैकी दोघांना पकडले आणि पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. त्यांच्याकडून पिस्तुल जप्त करण्यात आली आहेत. या दोन आरोपींची नावे उघड झाली असून हे दोघे बिश्नोई गँगचेच असल्याचे सांगितले जात आहे.
दोषींवर कठोर कारवाई करा – मल्लिकार्जुन खरगे
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी ‘एक्स’ अकाउंटवरून बाबा सिद्दिकी यांना श्रद्धांजली वाहिली. तसेच आरोपींना लवकरात लवकर पडकून कठोर कारवाई करण्याची मागणी केली. खरगे म्हणाले, “बाबा सिद्दिकी यांच्या मृत्यूची वार्ता धक्का देणारी आहे. या दु:खाच्या घडीत माझ्या संवेदना सिद्दिकी यांचे कुटुंबीय, मित्रपरिवार आणि कार्यकर्त्यांसोबत आहे. या घटनेची सखोल आणि पारदर्शक चौकशी करुन दोषींवर कठोरात कठोर कारवाई करावी.”