बिग बॉस विजेता सुरज चव्हाण अजित पवारांच्या भेटीला; दादांची सूरजला मोठी ऑफर, म्हणाले…

पुणे : मागील अनेक दिवसांपासून ज्या भेटीची चर्चा सुरु होती, ती भेट अखेर झाली आहे. बिग बॉस विजेता सूरज चव्हाण याने पुण्यात काल उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांची भेट घेतली. यावेळी अजित पवारांनी सूरज चव्हाणला घर बांधून देणार असल्याची घोषणा केली. त्याचप्रमाणे सूरजचे करिअर सेट करण्याचाही निर्धार अजितदादांनी केला असल्याचे पाहायला मिळाले. सूरजसाठी मी रितेशसोबत (Ritiesh Deshmukh) बोलणार असल्याचे यावेळी अजितदादांनी म्हटले आहे.

दरम्यान, बारामतीच्या सूरज चव्हाणने बिग बॉस मराठीची ट्रॉफी जिंकल्यावर त्याचे सर्वच क्षेत्रातून कौतुक केले जात आहे. सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार, अजित पवार सगळ्यांनी सूरजचे तोंडभरुन कौतुक केले. इतकेच नव्हे तर सूरज जेव्हा ट्रॉफी घेऊन बारामतीमध्ये आला त्यावेळी अजित पवारांनी फोन करुन सूरजला भेटीसाठी विचारले होते. पण त्यावेळी सूरजला शक्य झाले नाही. मात्र काल पुण्यात हे दोन बारामतीकर भेटले.

त्याचे आयुष्य मार्गी लावू…

सूरजच्या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना अजित पवार म्हणाले, सूरज बिंधास्त आहे. त्याच्या स्वभावामुळे तो बऱ्याच जणांना भावला. तो सगळ्यांमध्ये मिसळून राहिला. माझ्याच गावचा तो मुलगा आहे. मी त्याची पूर्ण माहितीही घेतली. आम्ही आता त्याला चांगले घर बांधून देणार आहोत. तसेच त्याला ज्या क्षेत्राची आवड आहे, त्यासाठीही त्याला मदत करु. मी रितेशसोबतही बोलणार आहे. त्याचे आयुष्य मार्गी लावू. त्याच्यावर आता योग्य लक्षही देऊ, असे अजित पवार म्हणाले.

रिलचे पैसे मिळतात का?

सूरज हा त्याच्या रिलमुळे जास्त फेमस झाला. तसेच बिग बॉसमध्येही त्याची एन्ट्री ही रिलमुळेच झाली. त्यावर अजित पवारांनी त्याला विचारले की, बिग बॉस मधे कसे बोलवले? तेव्हा सूरजने सांगितले की, रिल बघून मला बिग बॉसमध्ये बोलावले. मला बिग बॉसचा कॉल आला तेव्हा खरे वाटले नाही. पण मग खरे वाटले आणि गेलो. त्यानंतर रिलचे पैसे मिळतात का? त्यावर सूरजने म्हटले की, नाही रिलचे पैसे मिळत नाहीत. आता पिक्चर येतोय माझा, अशी माहिती त्याने दिली.

मी जे बोलतो ते करुन दाखवतोच – सूरज चव्हाण

अजित पवारांना सूरजने बिग बॉसच्या घरातील काही किस्सेसुद्धा सांगितले. त्यावेळी सुरजच्या बोलण्यावरुन अजित पवारांना देखील हसू आवरत नव्हते. सूरजने अजित पवारांना सांगितले की, दादा ट्रॉफी बारामतीमध्ये आणायची हे मी आधीच ठरवले होते. मला बिग बॉसनेही खूप सपोर्ट केला. मी जे बोलतो ते करुन दाखवतोच.