विजयादशमीच्या मुहूर्तावर नागपुरातून मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य, म्हणाले, OTT प्लॅटफॉर्मवर कायदा करायलाच हवा…

नागपूर : OTT प्लॅटफॉर्म्स हा आजच्या काळातला मनोरंजनाचा एक महत्त्वाचा स्रोत बनला आहे. इंग्रजी, हिंदी, मराठी अशा वेगवेगळ्या भाषांमधल्या वेबसीरिज, चित्रपट, डॉक्युमेंटरी, शॉर्ट फिल्म्स असा अगणित मजकूर या ओटीटी प्लॅटफॉर्म्सवरून प्रदर्शित केला जातो. प्रौढांसाठीच्या मजकुराला तसं प्रमाणपत्र व सूचना देऊन प्रदर्शित केले जाते. पण सर्वच प्रकारचा मजकूर या प्लॅटफॉर्म्सवर उपलब्ध होत असल्याचा मुद्दा वारंवार उपस्थित केला जातो. याचसंदर्भात आज सरसंघचालक मोहन भागवत यांनी विजयादशमी निमित्ताने नागपूरमध्ये संघाच्या मुख्यालयात केलेल्या भाषणातून तीव्र आक्षेप नोंदवला.

दरम्यान, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ प्रमुख मोहन भागवत यांनी आज विजयादशमीच्या मुहूर्तावर नागपुरात शस्त्रपूजन केले. त्यापूर्वी स्वयंसेवकांनी पथसंचलन केले. नागपूरमधील संघ मुख्यालयात झालेल्या या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, इस्रोचे माजी प्रमुख के. सिवन आणि के. राधाकृष्णन यांचीही उपस्थिती होती.

OTT प्लॅटफॉर्ममुळे तरुण पिढीवर वाईट परिणाम!

मोहन भागवत म्हणाले, OTT प्लॅटफॉर्मवर नियंत्रण आवश्यक आहे आणि त्याबाबत कायदा करायलाच हवा. तसेच, ओटीटी प्लॅटफॉर्मवर बिभत्सचेचे प्रदर्शन होते. त्याच्याबाबत कायदा हवे आणि नियंत्रणही त्यानेच होईल. ओटीटी प्लॅटफॉर्ममुळे तरुण पिढीवर वाईट परिणाम होत आहे, असे मोहन भागवत म्हणाले.

पाणी वाचविण्यावर भर दिला पाहिजे!

यावेळी त्यांनी पर्यावरणाच्या समस्येवरदेखील उद्बोधन केले. पर्यावरणामुळे ऋतूचक्र पालटत आहे. पर्यावरणाबाबत अपुरा दृष्टीकोन आहे. आपण जगाचे अंधानुकरण केले व त्यामुळे पर्यावरणाच्या विविध समस्या निर्माण झाल्या. आपल्या जैविक शेतीसारख्या पारंपारिक पद्धतींचा जीवनप्रणालीत समावेश करावा लागेल. तसेच आपण सर्वांनी पाणी वाचविण्यावर भर दिला पाहिजे यासोबतच सिंगल युझ प्लास्टिकचा वापर देखील बंद करायला हवा, असे देखील मोहन भागवत म्हणाले.

इस्रायल-हमास युद्धावर मोहन भागवत काय म्हणाले?

इस्रायल आणि हमासमध्ये सुरू झालेल्या युद्धामुळे प्रत्येकजण चिंतेत आहे. आपला देश पुढे जात आहे कारण तो सर्वांना मदत करतो आहे. जे शत्रू आहेत अशांनाही वेळप्रसंगी आपला देश मदत करतो. जगात अशा शक्ती आहेत ज्यांना भारताने पुढे जाऊ नये असे वाटते. मात्र जगातील देशांचा असा स्वभाव नाही. यामुळेच भारत पुढे जात आहे, असे ते म्हणाले.

हिंदूंनी संघटित आणि मजबूत राहिले पाहिजे!

लोक निवडलेले सरकार खाली खेचण्याचे काम देखील करतात. मात्र असे व्हायला नको. भारताच्या शेजारी बांग्लादेशात हेच घडले. तिथे हिंदू समाजाला लक्ष्य करत अत्याचार करण्यात आले. हिंदू समाजाने संघटित होऊन प्रतिकार केले. त्यांना भारत सरकारने मदत केली पाहिजे. बांगलादेशातील हिंदूंना जगभरातील हिंदू समाजाकडून ही मदतीची आवश्यकता आहे. भारताच्या हिंदू समाजाला लक्षात यायला हवे, दुर्बल राहणे नुकसानीचे आहे. जिथे जिथे हिंदू आहे, त्यांनी सशक्त राहिले पाहिजे. सशक्त राहून अत्याचारी बनू नये, मात्र सशक्त बनून राहिले पाहिजे, असेदेखील सरसंघचालक म्हणाले.