कोथरुड : राज्यात महायुती सरकारकडून ‘लाडकी बहीण योजना’ राबवली जात आहे. योजनेचे पैसे लाडक्या बहीणींच्या खात्यावर जमा देखील करण्यात आले आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीकडून या योजनेचा जोरदार प्रचार केला जातोय. अशात सरकारमधील एका मंत्र्याने महिलांसाठी आणखी एक मोठी घोषणा केली आहे. मंत्री चंद्रकांत पाटील यांनी महिलांसाठी दोन मोठ्या घोषणा केल्या आहेत. राज्य सरकार आता महिलांना पार्ट टाईम ४ तासांचा जॉब देणार आहे. यासोबतच त्यांना ११ हजार पगार देखील दिला जाणार आहे. या नव्या घोषणेची सध्या जोरदार चर्चा रंगली आहे.
दरम्यान, नवरात्रोत्सवाचे औचित्य साधून आणि उत्सवाच्या निमित्ताने उपासनेचे फळ सर्वांना लाभावे यासाठी चंद्रकांतदादा पाटील यांच्या पुढाकारातून कोथरुडमध्ये भव्य दिव्य अशा महा कन्यापूजन सोहळ्याचे आयोजन शुक्रवारी ( दि. ११) करण्यात आले होते. राज्यात प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणातील कन्यापूजन सोहळ्याने उपस्थित भारावून गेले.या सोहळ्यात नामदार चंद्रकांतदादा पाटील यांनी स्वत: मंत्रोच्चाराच्या घोषात, आध्यात्मिक पद्धतीने सात मुलींचे पूजन केले. यावेळी सहभागी मुलींचे डोळे पाणावून गेले. चंद्रकांतदादा पाटील यांच्या या उपक्रमाचे उपस्थित मुलींनी व त्यांच्या पालकांनी मोठे कौतुक केले.
दर महिन्याला १० हजार रुपये मानधन देणार!
चंद्रकांत पाटील म्हणाले, आज ५ हजार मुलींना लाठी-काठीचे प्रशिक्षण दिल्यानंतर मी १ लाख मुलींचे टार्गेट मानणारी घोषणा केली. या लाठी-काठी शिकलेल्या १०० मुलींना मी दर महिन्याला १० हजार रुपये मानधन देणार आहे. हे १० हजार रुपये मानधन घेऊन त्या मुलीने दिवसभर कॉलेज वगैरे करावे आणि संध्याकाळी दोन तास त्यांच्या परिसरातील मुलींना लाठी-काठी शिकवावे. आता २७ मिनिटांची एक डॉक्यूमेंट्री या सहासी खेळाडूंवर आली आहे, ज्यांना पारितोषिक मिळाले आहे. कोल्हापूरच्या तरुणाने ती केली. कोल्हापूरच्या गल्लोगल्लीत सर्वांच्या हातात काठ्याच असतात. त्यामुळे ती एक घोषणा केली, असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.
कॉलेजच्या मुलींना चार तासांचे जॉब!
महिला आणि कॉलेजच्या मुलींना चार तासांचे जॉब तयार झाले तर घराची जबाबदारी आणि कॉलेजची जबाबदारी सांभाळून मिळणाऱ्या १०-११ हजारांमध्ये त्या घर चालवायलाही योगदान देतील. महिलांना मुले, पती, सासू-सासरे आणि स्वत:ची कामे करायची आहेत. दुपारी १२ ते १ वाजेच्या सुमारास ती अशा परिस्थितीत असते की, सांगा आता काय करायचे? असे देखील चंद्रकांत पाटील म्हणाले.
११ हजार रुपये पगार आणि दोन्ही वेळेला जाणे-येणे फ्री!
मी महिनाभर खूप इंडस्ट्रीजसोबत बोललो. एका इंडस्ट्रीने मला प्रतिसाद दिला. १ हजार जॉब ते पार्ट टाईम निर्माण करणार आहेत. उद्या त्या जॉबचे प्रातिनिधिकपणे दोन जणांना अपॉईंटमेंट लेटर देणार आहोत. त्यानंतर जाहीरात काढणार, अर्ज येतील, मुलाखती होतील, ११ हजार रुपये पगार आणि दोन्ही वेळेला जाणे-येणे फ्री. ते इंडस्ट्रीत येणार आहेत. एकवेळचा नाष्टा आणि एकवेळचे जेवण फ्री, असा कमालीचा इंडस्ट्रिलिस्ट सापडला. मी या निमित्ताने त्याचे नाव सांगेन. दुर्दैवाने कालच त्यांचे निधन झाले. अशा स्वर्गीय रतन टाटा यांच्या टाटा समूहाने मला ऑफर दिल्यामुळे यापुढे मुली आणि महिलांना ११ हजार रुपये महिन्याची थेट टाटामध्ये नोकरी मिळणार आहे, असेदेखील चंद्रकांत पाटील म्हणाले. पुढे सांगताना ते म्हणाले, माझी खात्री अशी आहे की, ही संकल्पना संपूर्ण देशभरात रुजेल. त्यातून जॉबही निर्माण होतील. चार तासांचे जॉब असल्याने जास्त महिला काम करतील, चार तासांचे जॉब असल्याने जास्त ती घरालाही न्याय देईल. अशा दोन घोषणा मी आज केल्या, असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.