राज्य सरकारची मोठी घोषणा: महापालिका कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड, मिळणार 24000 रुपयांचा बंपर दिवाळी बोनस!

पुणे (महाराष्ट्र) : ठाणे महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना २४ हजार रुपये एवढे सानुग्रह अनुदान देण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी काल (११ ऑक्टोबर) सायंकाळी आनंद योग कुटिर येथे केली. ठाणे पालिकेने सन २०२२-२३साठी २१ हजार ५०० रुपये इतके सानुग्रह अनुदान दिले होते. त्यात २ हजार ५०० रूपयांची वाढ करून २४ हजार देण्याचे आदेश मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले.

दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी काल सायंकाळी आनंद योग कुटिर येथे एका कार्यक्रमात याबाबतची घोषणा केली असून याप्रसंगी व्यासपीठावर, खासदार नरेश म्हस्के, आमदार प्रताप सरनाईक, माजी आमदार रवींद्र फाटक, माजी महापौर मीनाक्षी शिंदे, माजी नगरसेवक विकास रेपाळे, नम्रता भोसले, मीनल संख्ये, महापालिका आयुक्त सौरभ राव, अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी आणि प्रशांत रोडे, उपायुक्त जी. जी. गोदेपूरे आणि उमेश बिरारी उपस्थित होते.

कर्मचाऱ्यांना ३० हजार सानुग्रह अनुदान मिळावे अशी युनियनची मागणी!

ठाणे पालिका कर्मचाऱ्यांना ३० हजार सानुग्रह अनुदान मिळावे अशी मागणी युनियन तर्फे करण्यात आली होती. तसे पत्र देखील प्रशासनाला सादर करण्यात आले होते. याबाबत युनियनचे अध्यक्ष रवी राव यांच्या मार्गदर्शनाखाली संघटनेचे पदाधिकारी प्रशासनाकडे सतत पाठपुरावा करत होते. तसेच, युनियनचे उपाध्यक्ष मोहन तिवारी यांनी १० ऑक्टोबर रोजी आयुक्त सौरभ राव यांच्या बरोबर चर्चा केली. चर्चेत माननीय आयुक्तांनी सांगितले की कामगार कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे. तसेच सानुग्रह अनुदान अदा करण्यास तत्वतः मान्यता दिली. दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्या बरोबर चर्चा करून सानुग्रह अनुदान जाहीर करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. शिंदे यांनी कामगार कर्मचाऱ्यांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांवर नेहमीच सकारात्मक भूमिका घेऊन त्यांना न्याय दिला आहे. यावर्षी सुद्धा त्यांनी २४ हजार सानुग्रह अनुदान जाहीर केला आहे.

पुण्यातील १८ हजार कर्मचारी अधिकाऱ्यांची दिवाळी गोड!

पुणे महापालिकेतील सुमारे १८ हजार कर्मचारी, अधिकाऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे. त्यांना दिवाळीपूर्वी ८.३३ टक्के बोनस त्याचप्रमाणे २३ हजार रुपयांचे सानुग्रह अनुदानाची रक्कम बँक खात्यात जमा होणार आहे. याबाबत वित्त व लेखा विभागाने यासंदर्भात परिपत्रक काढले आहे. पुणे महापालिकेकडून दरवर्षी महापालिका अधिकारी, कर्मचारी, महापालिकेचे शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांना दिवाळीनिमित्त सानुग्रह अनुदान आणि बोनस देण्याचा निर्णय दिला जातो. यासाठी अर्थसंकल्पात सुमारे १२५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

नाशिकमधील कर्मचाऱ्यांना २० हजार बोनस जाहीर!

नाशिक मनपाच्या कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मनपाच्या साडेचार हजार कर्मचाऱ्यांना २० हजार बोनस जाहीर झाला आहे. तसेच मानधनावर असलेल्या विविध विभागात काम करणाऱ्या ५५० कर्मचाऱ्यांना १० हजार दिवाळी बोनस जाहीर झालाय. कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस जाहीर झाल्याने पालिकेच्या तिजोरीवर ९ कोटी ५५ लाखांचा बोजा पडणार आहे.