चेन्नईत ‘एअर शोदरम्यान’ ५ प्रेक्षकांचा मृत्यू, गर्दी आणि उष्माघात ठरला जीवघेणा!

चेन्नई : रविवारी चेन्नई येथील मरीना बीचजवळ भारतीय हवाई दलाच्या विमानांचा एअर शो आयोजित करण्यात आला होता. यावेळी हजारोंचा जनसमुदाय जमला होता. धक्कादायक बाब म्हणजे अशी की, इथे जमलेल्या मोठ्या गर्दीमुळे पाच जणांचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे. सध्या तर अनेकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. एका वरिष्ठ शहर पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, एका व्यक्तीचा समुद्रकिनाऱ्यावर मृत्यू झाला आणि इतर चार जण आसपासच्या भागात मरण पावले. तसेच, हे पाचही लोक एअर शो पाहण्यासाठी आले होते असे समजते.

दरम्यान, चेन्नईत हवाई दलाच्या एअर शोदरम्यान गर्दीमुळे पाच जणांचा मृत्यू झाला असून, या काळात ३० हून अधिक लोकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे आणि सर्वांवर सध्या उपचारही सुरू आहेत.

कडक उन्हात उभे असलेले लोक!

खरे तर, भारतीय हवाई दलाचा एअर शो पाहण्यासाठी हजारो लोक कडक उन्हात किमान २ ते ३ तास उभे होते. या गर्दीतील काही लोकांनी स्वत:च्या बचावासाठी छत्र्या धरल्या होत्या. एअर शो सकाळी ११ ते दुपारी १ दरम्यान आयोजित करण्यात आला असला तरी, बहुतेक लोक किमान एक तास अगोदरच कार्यक्रमस्थळी पोहोचले होते.

३० हून अधिक लोकांवर उपचार सुरू!

डिहायड्रेशनची लक्षणे असलेल्या ३० हून अधिक लोकांना जवळच्या सरकारी रुग्णालयात नेण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. सर्व लोकांवर उपचार सुरू आहेत. प्रत्यक्षात एअर शोनंतर आजूबाजूचे सर्व रस्ते जाम झाले होते. बसस्थानक, मेट्रोसह सर्वच ठिकाणी लोकांची गर्दी दिसून आली. यावेळी, लोकांना बस पकडण्यासाठी किंवा मेट्रो स्थानकांपर्यंत पोहोचण्यासाठी लांब अंतर चालावे लागले. त्यानंतर गर्दीवर नियंत्रण मिळवण्यात यश आल्याचे पोलिसांनी सांगितले.

या सर्व प्रकारानंतर भाजपच्या ‘या’ नेत्याचा इशारा!

सदर कार्यक्रमामध्ये घडलेल्या या सर्व प्रकारानंतर भाजप नेते अन्नामलाई यांनी डीएमके सरकारवर निशाणा साधला. दरम्यान, सूत्रांच्या माहितीनुसार वाहतूक पोलिसांमध्ये सुसूत्रतेचा अभाव असल्यामुळे इतके मोठे संकट ओढावल्याची माहिती समोर आली आहे. एकट्या रविवारी चेन्नईमध्ये वाहतुक मार्गांवर अनेजण अडकून पडले तर, मरिना समुद्रकिनारी असणाऱ्या गर्दीनं सर्वांनाच धडकी भरवली.