नागपूर: नितीन गडकरींचे पुन्हा एक नवीन स्वप्न; आता लवकरच विमानांप्रमाणे धावणारी बस सुरू!

नागपूर : नागपूरात मेट्रो सह अनेक उड्डाणपूल बांधल्यानंतर आता गडकरींनी नागपुरात अत्याधुनिक आणि विमानासारखी सोय असलेल्या बस सेवेचे नवीन स्वप्न पाहिले आहे. नागपूरच्या अगदी जवळ वसलेल्या वाडी सह संपूर्ण रिंग रोड वर ५० किमी अंतरापर्यंत विशेष इलेक्ट्रिक बस सुरू केली जाणार असल्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी जाहीर केले.

दरम्यान, गडकरी हे नागपुरातील वाडी येथील नव्या उड्डाणपुल व सिमेंट रस्त्याच्या लोकार्पण सोहळ्या प्रसंगी बोलत होते. यावेळी त्यांनी वाडी येथील उड्डाणपुलाचे काम चांगले झाल्याचे सांगत यासाठी काम करणाऱ्या अधिकारी आणि कॉन्टॅक्टरचे अभिनंदन केले. वाडी येथील उड्डाणपुलाच्या कामात बोट ठेवायला जागा मिळाली नाही, इतके चांगले काम झाल्याचे नितीन गडकरी यावेळी म्हणाले.

वाडीचे चित्र पूर्णपणे बदलले!

आज वाडीचे चित्र पूर्णपणे बदलले आहे. मी इथे उभा होतो, तेव्हा इथे रोडवर ट्रकचे साम्राज्य होते. पण आता या उड्डाणपुलाचे चित्र बदलले आहे. दुसरे म्हणजे विद्यापीठापासून व्हेरायटी चौकापर्यंत उड्डाणपूल होत आहे. जर वाडी विकसित होत आहे, मग तुम्ही ते विकसित करायचे की नाही हे ठरवा. जर करायचे असेल तर रस्त्यावर अतिक्रमण करू नका. कोंबड्या, बकऱ्या रस्त्यावर बांधू नका. इथे एक अॅग्रो सेंटर बनवला जात आहे. त्या ठिकाणी वर्षभर कृषी संदर्भात संशोधन आणि कार्यक्रम होईल, असे नितीन गडकरींनी म्हणाले.

विमानांप्रमाणे धावणारी बस लवकरच सुरू!

आपण लवकरच वाडीमधून रिंगरोडने चालेल, अशी एक बस सुरु करणार आहोत. ही बस आधुनिक स्वरुपाची असेल. ही बस विमानांप्रमाणे असणार आहे. ही नवीन बस इलेक्ट्रीक असेल. ती एका चार्जिंगवर ५० किमी धावेल. त्यानतंर ती थांबेल. यानंतर परत चार्ज केल्यावर ती पुढे धावेल. ही देशातील एकमात्र बस असेल. यात सर्व सुविधा असतील. विशेष म्हणजे या बसचे तिकीट हे डिझेल बसपेक्षा कमी असेल, असे नितीन गडकरींनी सांगितले.

अधिकाऱ्यांचा बेजबाबदारपणा!

नागपुरात नेशनल हायवे अथोरिटी ऑफ इंडियाच्या अधिकाऱ्यांचा बेजबाबदारपणा समोर आला आहे. नागपूर जवळच्या वाडीमध्ये केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी काल (५ ऑक्टोबर) संध्याकाळी एनएचएआयने तयार केलेल्या उड्डाणपुलाचे लोकार्पण केले. या पार्श्वभूमीवर नागपूर युनिव्हर्सिटी कॅम्पसपासून वाडीच्या उड्डाणपूलापर्यंत सुमारे अडीच किलोमीटर लांबीच्या सिमेंट रस्त्याचेही लोकार्पण पार पडले. यानिमित्ताने अधिकाऱ्यांनी सिमेंट रस्त्याच्या दुभाजकावर लावलेल्या स्ट्रीट लाईटच्या खांबावर तिरंग्याच्या रंगाने विद्युत रोषणाई केली होती. मात्र, बेजबाबदार अधिकाऱ्यांनी विद्युत रोषणाईमध्ये तीन रंगांचा क्रम राष्ट्रीय ध्वजामधील रंगाच्या क्रमाच्या अगदी विपरीत लावला. त्यामुळे विद्युत रोषणाईच्या माध्यमातून दिसणारा राष्ट्रीय ध्वज नेमका उलटा दिसत होता. त्यात हिरवा रंग सर्वात वर तर केशरी रंग सर्वात खाली दिसत होता.