Acidity: अ‍ॅसिडिटीची समस्या सोडवण्यासाठी करा ‘हे’ घरगुती उपाय; जाणून घ्या सविस्तर माहिती!

HEALTH TIPS : कमी वेळेत जास्त खाणे किंवा तळलेले पदार्थ किंवा मिठाई खाल्ल्याने पोटात अ‍ॅसिडिटी सारख्या अपचनाच्या समस्या उद्भवू शकतात. अ‍ॅसिडीटी रिफ्लक्‍स म्‍हणून देखील ओळखली जाणारी ही स्थिती पोटात मोठ्या प्रमाणात अ‍ॅसिड निर्माण झाल्‍यामुळे उद्भवते. अन्‍ननलिकेमध्‍ये हे खाद्यपदार्थ परतत असल्‍याने अॅसिडीटी होते. यामुळे छातीमध्‍ये असह्य जळजळ होऊ शकते, घशामध्‍ये आंबट चव जाणवू शकते. पचन, मळमळ आणि बद्धकोष्ठता ही देखील अ‍ॅसिड रिफ्लक्सची इतर सामान्य लक्षणे आहेत. ३० टक्‍के भारतीयांना वारंवार छातीत जळजळ, पोटात गोळा येणे आणि मळमळ होण्याची लक्षणे जाणवतात. ही सामान्यत: अ‍ॅसिड रिफ्लक्स किंवा गॅस्ट्रोएसोफेगल रिफ्लक्स आजाराची लक्षणे आहेत, जे जीईआरडी म्हणून ओळखली जाते आणि त्‍यामुळे लक्षणीय अस्वस्थता येऊ शकते.

दरम्यान, आहार व जीवनशैली सवयींमुळे भारतातील अधिकाधिक व्‍यक्‍तींना अ‍ॅसिडीटीचा त्रास होत आहे. संतुलित आहाराचे सेवन करत अ‍ॅसिडीटीमध्‍ये सुधारणा करता येऊ शकते. तसेच झटपट थंड करणारे अँटासिड्स देखील जलद आणि प्रभावी आरामासाठी एक पर्याय असू शकतो. पोटातील अ‍ॅसिडीटीशी संबंधित अस्वस्थता कमी केल्याने व्‍यक्‍तींना त्‍यांचा उर्वरित दिवस उत्तम व्यतित करण्यास आणि निरोगी, परिपूर्ण जीवनाचा भाग म्हणून ज्या गोष्टींचा आनंद मिळतो. चला तर मग जाणून घ्या या ॲसिडिटीच्या समस्येपासून तुम्ही कशी सुटका करू शकता? खालील दिलेले काही घरगुती उपाय खूप प्रभावी ठरू शकतात.

१) बडीशेपचे पाणी

बडीशेप खाल्ल्याने पोटाच्या समस्या कमी होतात. हे साधे खाल्ले जाते आणि त्याचे पाणी देखील पिले जाते. बडीशेप पाण्यात टाकून उकळा. एका ग्लास पाण्यासाठी एक चमचा बडीशेप वापरा. पाण्याचा रंग बदलला की गॅस बंद करा. हे कोमट पाणी प्यायल्याने ॲसिडिटीपासून आराम मिळतो.

२) कोरफड रस

ॲसिडीटीपासून सुटका मिळवण्यासाठी कोरफडीचा ज्यूसही पिला जाऊ शकतो. कोरफडीचा रस पोटाला आराम देतो. यामुळे पचनक्रिया देखील चांगली होते.

३) बेकिंग सोडा

छातीत जळजळ आणि ऍसिडिटी असल्यास बेकिंग सोडा पाणी प्यायल्याने आराम मिळतो. एका ग्लास पाण्यात अर्धा चमचा बेकिंग सोडा टाकून प्या. बेकिंग सोडा नैसर्गिक अँटासिडप्रमाणे काम करतो आणि ॲसिडिटीपासून त्वरित आराम देतो.

४) थंड दूध

ॲसिडिटीमुळे पोटात जळजळही जाणवते. अशा परिस्थितीत थंड दुधाचे सेवन फायदेशीर ठरते. एक ग्लास थंड दूध प्यायल्याने ॲसिडिटी आणि पोटात जळजळ या दोन्ही समस्यांपासून आराम मिळतो.

५) केळी

फायबर आणि पोटॅशियम युक्त केळीमुळे ॲसिडिटीपासूनही आराम मिळतो. जेव्हाही तुम्हाला पोटात आम्लपित्ताचा त्रास जाणवतो किंवा पोट फुगायला लागते तेव्हा तुम्ही केळी खाऊ शकता.

(टीप : वरील उपाय केवळ माहितीकरिता सांगितले असून, कुठलाही उपाय करताना डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या)