महाराष्ट्रासाठी ऐतिहासिक दिवस! राज्यात ३ ऑक्टोबर दरवर्षी ‘मराठी अभिजात भाषा दिवस’ म्हणून साजरा होणार, राज्य सरकारची घोषणा!

मुंबई : ३ ऑक्टोबर हा दिवस ‘मराठी अभिजात भाषा दिवस’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. केंद्र सरकारने गुरुवारी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर आज (शुक्रवार) राज्य सरकारने या निर्णयाबद्दल आनंद व्यक्त केला आहे.

दरम्यान, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह संपूर्ण मंत्रिमंडळाने महाराष्ट्राचे आणि जगभरातील मराठीजनांचे अभिनंदन केले. तसेच जो विषय इतके वर्ष प्रलंबित होता, त्याला मान्यता दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि केंद्रीय मंत्री गजेंद्रसिंग शेखावत यांचे आभार व्यक्त करणारा ठराव यावेळी करण्यात आला. तसेच, ३ ऑक्टोबर हा दिवस दरवर्षी मराठी अभिजात भाषा दिवस म्हणून साजरे करण्याचा निर्णय देखील घेण्यात आला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर याबाबत माहिती दिली आहे.

देवेंद्र फडणवीस यांची पोस्ट काय?

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला असून आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी, मी, तसेच उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि संपूर्ण मंत्रिमंडळाने याबाबत अत्यानंद व्यक्त केला. जो विषय इतके वर्ष प्रलंबित होता, त्याला मान्यता दिल्याबद्दल मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, मा. केंद्रीय गृहमंत्री अमितभाई शाह आणि केंद्रीय मंत्री गजेंद्रसिंग शेखावत यांचे आभार व्यक्त करणारा ठराव आज करण्यात आला. दरम्यान, ३ ऑक्टोबर हा दिवस दरवर्षी मराठी अभिजात भाषा दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय सुद्धा आम्ही घेतला, अशी माहिती फडणवीस यांनी दिली.

ऐतिहासिक दिवस!

मराठी भाषा आणि मराठीवर प्रेम करणाऱ्या नागरिकांनी सुवर्ण अक्षरांनी लिहून ठेवावा असा हा महाराष्ट्रासाठी ऐतिहासिक दिवस आहे. जगभरात साता समुद्रापार पोहोचलेल्या मराठी भाषेचा सन्मान करणाऱ्या मराठी माणसासाठी ही अभिमानाची गोष्ट आहे. मराठी भाषेला मिळालेल्या अभिजात दर्जाबद्दल केंद्रीय मंत्रिमंडळाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आभार मानले. मराठीला ‘अभिजात’ भाषेचा दर्जा देण्यासाठी राज्य सरकारने अनेकदा केंद्र सरकारकडे प्रयत्न केले होते. या सरकारने यासाठी आग्रह देखील धरला होता आणि नीती आयोगाच्या बैठकीत देखील हा विषय राज्य सरकारने मांडला. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या विषयावर निर्णय घेत मराठी भाषेला अभिजात दर्जा दिला आहे.