महिनाभर चहा न पिल्याने शरीरात काय बदल होतात? चहा फायदेशीर आहे की हानिकारक? जाणून घ्या सविस्तर माहिती!

Health tips : आपल्यापैकी बहुतेकजण आपल्या दिवसाची सुरुवात चहाने करतात. काही संशोधनात असे सूचित केले आहे की दुधाच्या चहाऐवजी काळ्या चहाचे अनेक आरोग्य फायदे होऊ शकतात, तर काही संशोधकांचे असे मत आहे की चहामध्ये कॅफीन असल्यामुळे, त्याचे नियमित किंवा जास्त सेवन केल्याने अनेक दुष्परिणाम देखील होऊ शकतात. चला तर मग आज जाणून घेऊया जर एखाद्याने ३० दिवस चहा अजिबात न पिल्यास शरीरात कोणते बदल होऊ शकतात?

दरम्यान, मर्यादित प्रमाणात चहा पिणे बहुतेक लोकांसाठी हानिकारक मानले जात नाही, परंतु जर तुम्ही दिवसातून चार-पाच वेळा जास्त प्रमाणात प्यायला तर त्याचे काही दुष्परिणाम होऊ शकतात. चहामध्ये असलेल्या कॅफीन आणि टॅनिनमुळे बहुतेक समस्या उद्भवतात. मग चहा सोडला तर काय फायदा होऊ शकतो? जाणून घेऊया.

१) रक्तदाब नियंत्रणात राहील

चहा प्यायल्यानंतर थकलेल्या शरीराला काही प्रमाणात उर्जा मिळते. चहामुळे फुर्ती येत असल्याचे बऱ्याच लोकांना वाटते. पण तुम्हाला माहित आहे का चहामुळे मिळणारी ही उर्जा पुढे अनेक आजारांना आमंत्रण देणारी ठरते. चहामध्ये असणाऱ्या कॅफेनमुळे शरीरातील रक्तदाब वाढतो. अती चहा प्यायल्याने उच्च रक्तदाबाची समस्या होऊ शकते. हे टाळण्यासाठी एक महिना चहा पिणे बंद करा. सुरुवातीच्या दिवसात तुम्हाला थोडसं सुस्त आणि थकवा जाणवेल, पण रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी तुम्हाला खूप फायदा होईल.

२) दात चमकदार राहतात

तुम्हाला माहित आहे का, तुमचा आवडता चहा तुमच्या दातांवरही परिणाम करत असतो? हे खरे आहे. चहामध्ये असलेले ऍसिड आपल्या दातांचे इनॅमल कमकुवत करते. त्यामुळे पिवळेपणा, डाग आणि दातांची संवेदनशीलता यासारख्या समस्या उद्भवू शकतात. महिनाभर चहाचे सेवन बंद केल्याने तुमच्या दातांचा रंग हळूहळू नैसर्गिकरित्या चमकू लागेल आणि दात किडण्यापासूनही रोखता येईल.

३) वजन नियंत्रणात राहते

अती चहा पिण्याचा वजनावरही वाईट परिणाम होतो. चहा आणि कॉफीमध्ये असलेली साखर आणि कॅफिन वजन कमी करण्यात अडथळा आणतात आणि पचनावर देखील वाईट परिणाम करतात. जर तुम्ही नियमित चहापासून महिनाभर दूर राहिलात तर वजन कमी करण्यात तुम्ही यशस्वी होऊ शकता.

४) शांत झोप लागते

दिवसभरातल्या थकव्यानंतरही रात्री शांत झोप येत नसेल तर यामागेही चहाचा छंद जबाबदार ठरू शकतो. एक महिना चहा पूर्णपणे बंद करा, तुम्हाल याचे चांगले परिणाम जाणवू लागतील. रात्री शांत झोप तर लागेलच शिवाय सकाळी उठल्यानंतरही ताजेतवाणे वाटेल. कॅफिन सोडल्याने तुमची झोप तर पूर्ण होईलच पण चिंता आणि तणावही कमी होण्यास मदत होईल.

५) मधूमेहावर नियंत्रण मिळवता येईल

चहात वापरल्या जाणाऱ्या साखरेमुळे शरीरातील साखरेची पातळी वाढण्याचा धोका असतो. एक महिना चहाचे सेवन करणे बंद केल्यास तुमच्या रक्तातील साखरेची पातळी बऱ्याच अंशी नियंत्रणात येऊ शकते. कॅफिन रक्तातील साखरेची पातळी आणि त्याच्याशी संबंधित समस्या देखील वाढवते.