खापरखेडा : सावनेर तालुक्यातील खुबाळा गावाच्या धाडसी निर्णयाने ग्रामस्थ नव्या अडचणीत सापडले असल्याची माहिती समोर आली आहे. शौर्याचे कृत्य करत, गावातील २५ लोक शनिवारी दुपारी गुरांची शिकार करणाऱ्या वाघाला शोधण्यासाठी जंगलात गेले. मात्र आश्चर्याची बाब अशी आहे की, अंधार पडल्यानंतर २५ पैकी केवळ २२ घरी परतले आणि तिघे बेपत्ता झाल्याचे समोर आले.
दरम्यान, वनपरिक्षेत्रातील खुबाळा हे गाव हे पेंच अभयारण्याच्या सीमेवर असलेल्या सालेघाट वनपरिक्षेत्राला लागून आहे. याच गावात शनिवारी दुपारी २ वाजता वाघाने तीन जणांचा बळी घेतला, असल्याची प्राथमिक माहिती आहे.
लोकांनी स्वतःच वाघ शोधून बदला घेण्याचे ठरवले!
शेतीच्या कामात वापरल्या जाणाऱ्या दुभत्या व पाळीव जनावरांच्या हत्येमुळे संतप्त झालेल्या लोकांनी स्वतःच वाघ शोधून बदला घेण्याचे ठरवले. त्यानुसार, गावातील २५ लोक वाघाच्या शोधासाठी जंगलात गेले, अंधार पडल्यानंतर ते सायंकाळी ७ वाजता गावात परतले. मात्र, गजानन खुबाळकर (६५), भुजंग ठाकरे (६०) आणि लोकेश ठाकरे (४०) यांचा त्यात समावेश नव्हता. त्यामुळे त्यांचे कुटुंबीय चिंतेत पडले, आणि तात्काळ ही माहिती वनविभागाला देण्यात आली.
जंगलात तिघांचा शोध सुरू!
वनविभागाला माहिती दिल्यानंतर रात्री १० च्या सुमारास वनविभागाचे पथक तिघांचा शोध घेण्यासाठी जंगलात रवाना झाले. व माहितीनुसार, रात्री उशिरापर्यंत शोध सुरूच होता मात्र अद्यापही तिघांपैकी कुणाचाही शोध लागलेला नाही. दरम्यान, खापा वनपरिक्षेत्राच्या प्रशिक्षणार्थी आरएफओ ऐश्वर्या शिंदे यांनी सांगितले की, सध्या वनविभागाचे पथक तपासात व्यस्त आहे, आणि जोपर्यंत कुठलीही माहिती मिळत नाही तोपर्यंत शोध सुरूच राहील, असे त्या म्हणाल्या.