महायुतीचा फाॅर्म्युला ठरला! भाजपला १६० तर शिवसेनेला केवळ ‘इतक्या’ जागा; अमित शाह यांची रात्री उशिरापर्यंत दीर्घ चर्चा काय?

मुंबई : महायुतीचे जागा वाटपाचे सुत्र जवळपास निश्चित झाले असून भाजपला १६० तर शिवसेनेला (शिंदे गट) ८० ते ८५ जागा मिळणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसला (अजित पवार गट) ४० ते ४५ जागा मिळणार असल्याची शक्यता आहे. तसेच, जेथे ज्याचा आमदार त्याला ती जागा असे देखील सुत्र निश्चित करण्यात आले असल्याचे समजते.

दरम्यान, भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडून गृहमंत्री अमित शाह आणि दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांकडे भाजपने १६० जागा लढवण्याची मागणी केली होती. त्या मागणी प्रमाणे भाजप १६० जागा लढणार असल्याच्या सांगण्यात येत आहे. शिवसेना (शिंदे गट) १२० जागांसाठी आग्रही होती. शिवसेनेच्या प्रवक्त्यांकडून त्यांची १२० जागांची मागणी असल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. मात्र, शिवसेना ८० ते ८५ जागा मिळण्याची शक्यता आता वर्तवण्यात येत आहे.

रात्री उशिरापर्यंत अमित शाह यांची दीर्घ चर्चा!

छत्रपती संभाजीनगरमध्ये रात्री उशिरापर्यंत शाह यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी दीर्घ चर्चा केली. १५० ते १६० जागा भाजपने लढवाव्यात आणि उर्वरित आपसात कशा वाटून घ्यायच्या याचा निर्णय शिंदे-अजित पवार यांनी फडणवीस यांना सोबत घेऊन करावा. भाजप कोणत्याही परिस्थितीत १५० पेक्षा कमी जागा लढणार नाही, असे कालच्या बैठकीत भाजपकडून स्पष्ट करण्यात आल्याची माहिती आहे.

३९ जागांची वाटणी कशी होणार?

भाजपने १५५ जागा लढविल्या, तर शिंदेसेना व अजित पवार गटाच्या वाट्याला १३३ जागा येतील. १५५ पेक्षा भाजप जेवढ्या कमी जागा लढेल तेवढ्या मित्रपक्षांच्या जागा वाढतील. शिंदे यांच्यासोबत स्वत:चे ४० व १० अपक्षांसह ५० आमदार आहेत. अजित पवार गटाकडे काँग्रेसच्या तीन आमदारांसह ४४ आमदार आहेत. शिंदे व अजित पवार गट मिळून आमदार संख्या ९४ इतकी आहे. सिटिंग-गेटिंग फॉर्म्युल्यानुसार या जागा अनुक्रमे शिंदेसेना व अजित पवार गटाला मिळतील. मग ३९ जागा उरतील. त्या दोन पक्ष कशा वाटून घेतात त्यावर जागावाटपाचा अंतिम फॉर्म्युला अवलंबून असेल. भाजप आपल्या कोट्यातून लहान मित्रपक्षांसाठी काही जागा सोडणार असल्याचे समजते.