ही तर फक्त सुरुवात; सरकार बदलल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, शरद पवारांचा महायुतीला इशारा!

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit shah) महाराष्ट्र दौऱ्यावर असून कोल्हापूरमध्ये त्यांचा आज पदाधिकाऱ्यांचा मेळावा होत आहे. दुसरीकडे, परळी तालुक्यातील सक्रिय कार्यकर्ते राजेभाऊ फड यांनी आज शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. यावेळी बोलताना शरद पवार यांनी महायुतीला इशारा दिला.

दरम्यान, आगामी विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू असून राजकीय पक्षांकडून वाटाघाटी आणि उमेदवारांची चाचपणी सुरू आहे. महाविकास आघाडीला लोकसभा निवडणुकांमध्ये चांगले यश मिळाल्याने सध्या महाविकास आघाडीकडे येणाऱ्यांची संख्याही वाढत आहे. त्यात, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडल्यानंतर आता शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडेही (NCP) राजकीय नेत्यांचा ओढा वाढला आहे.

राज्यात सरकार बदलल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही!

शरद पवार म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसने १० जागा लढवल्या, त्यापैकी ८ जागा जिंकून आणल्या. आमच्या नावावर निवडून आले आणि मग भाजपसोबत सत्तेत जाऊन बसले, लोकांची फसवणूक या लोकांनी केली आहे. सत्तेमध्ये सहभागी झाले. ही तर फक्त सुरुवात आहे. परळीमध्ये मोठी सभा आपण घेऊ आणि दाखवून देऊ. आता फक्त दोन महिने राहिले आहेत. राज्यात सरकार बदलल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही, असा एल्गार शरद पवार यांनी केला.

धनंजय मुंडे यांच्यावर नाव न घेता टीका!

शरद पवार म्हणाले की, सत्तेचा गैरवापर तुमच्या भागात केला जातो. अनेकांना त्रास दिला जातो. सत्ता सामान्य माणसाला यातना देण्यासाठी कशी वापरायची हे तुमच्या ठिकाणी दिसते. आमच्या नावावर निवडून आले आणि सत्तेत जाऊन भाजपसोबत बसले आणि लोकांची फसवणूक केली. राजकारण हे समाजकारणाला साथ देणारे असले पाहिजे, असे राजकारण मान्य नाही म्हणून फड यांनी पक्षात येण्याचा निर्णय घेतला. ही तर सुरुवात आहे, अशा शब्दात शरद पवार यांनी नाव न घेता धनंजय मुंडेंना लक्ष्य केले. तसेच, परळीत एक मोठी सभा आपण लवकरच घेणार आहोत, असेही त्यांनी सांगितले.