अकोला : राज्य सरकारची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना (ladki bahin yojana) चांगलीच लोकप्रिय झाली आहे. या योजनेंतर्गत आत्तापर्यंत २ कोटींपेक्षा जास्त महिलांना लाभ मिळाला असून थेट त्यांच्या बँक खात्यात ही लाभाची रक्कम जमा झाली आहे. मात्र, या योजनेचा लाभ गैरमार्गाने देखील काहींनी मिळवल्याचे प्रकरण आता समोर आले आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी जनसन्मान यात्रेतील भाषणात बोलताना अजित पवारांनी देखील चुकीच्या पद्धतीने लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलेल्या साताऱ्यातील एका व्यक्तीचा उल्लेख केला होता. आता, अकोला (Akola) जिल्ह्यातून चक्क ६ जणांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी खोटे कागदपत्रे जमा केल्याचे प्रकरण समोर आले आहे. याबाबत, अकोला जिल्ह्यातील महिला व बालकल्याण अधिकारी यांनी माहिती दिली आहे. सध्या या घटनेतील ६ लाडक्या भावांवर कारवाई करत त्यांचे आधारकार्ड निलंबित करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले आहे.
योजनेसाठी खोटी माहिती भरून लाभ घेण्याचा प्रयत्न!
सरकारने राज्यातील महिलांसाठी लाडकी बहीण योजना आणली. मात्र, अकोल्यात या योजनेचा लाभ घेण्याचा प्रयत्न चक्क सहा ‘लाडक्या भावां’नी केला आहे. या योजनेसाठी असलेल्या ‘नारीशक्ती दूत’ ॲपवर अकोला शहरातील सहा व्यक्तींनी योजनेचा अर्ज भरलाय. अर्जाच्या छाननीत ही बाब समोर आलीय. यात या सहा पुरुषांनी खोटी माहिती भरत योजनेचा लाभ घेण्याचा प्रयत्न केलाय. या सहाही जणांकडून याचा खुलासा मागविण्यात आला आहे. त्यानंतर त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे. दरम्यान, या योजनेसाठी खोटी माहिती भरून लाभ घेऊ पाहणाऱ्या या सहाही जणांचे आधार कार्ड महिला आणि बालकल्याण विभागाकडून निलंबित करण्यात आले असल्याचे समजते.
योजनेच्या तिसऱ्या हप्त्याचे वितरण २९ सप्टेंबर!
आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुती सरकारकडून राज्यात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली. या योजनेला राज्यात मोठा प्रतिसाद मिळत आहे. एकट्या अकोला जिल्ह्यातील ४ लाख ३५ हजार २३८ महिलांनी लाडकी बहीण योजनेसाठी ऑनलाइन तसेच ऑफलाइन फॉर्म भरलेत. यापैकी ४ लाख २६ हजार २४० अर्ज मंजूर झाल्याचे सांगितले जात आहे. तसेच, लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया अजूनही चालूच असून येत्या ३० सप्टेंबरपर्यंत महिलांना या योजनेसाठी अर्ज करता येणार आहे. या योजनेच्या तिसऱ्या हप्त्याचे वितरण येत्या २९ सप्टेंबर रोजी होणार आहे. याबाबतची अधिकृत माहिती महिला व बालविकास कल्याण विभागाच्या मंत्री आदिती तटकरे यांनी दिली. या निर्णयामुळे आता लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिलांना प्रतिमहा १५०० रुपये या हिशोबाने पैसे मिळणार आहेत.