महाराष्ट्र : नैॡत्य मोसमी वाऱ्यांच्या (मॉन्सून) परतीच्या प्रवासाला सुरुवात झाली असतानाच, राज्यात पुन्हा पाऊस सक्रिय झाला आहे. आज (२४ सप्टेंबर) राज्यात वादळी वारे, विजांसह जोरदार पावसाची शक्यता असल्याने कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात दक्षतेचा इशारा (ऑरेंज अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे. तसेच, राज्यात सर्वदूर पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.
दरम्यान, परतीचा प्रवास सुरू झाल्याने मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा निवळून गेला आहे. मध्य बंगालच्या उपसागरात समुद्र सपाटीपासून ५.८ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. या वाऱ्यांच्या प्रभावामुळे पूर्व-मध्य बंगालच्या उपसागरात आज कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याचे संकेत असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे.
पुढील २४ तासांसाठी वादळी पावसाची शक्यता!
हवामान विभागाच्या माहितीनुसार (IMD department) राज्यात सध्या पाऊस सक्रिय झाला असून, पुढील २४ तासांसाठी वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यादरम्यान मध्य महाराष्ट्र, कोकण, मराठवाडा या भागांना पावसाचा यलो लर्ट जारी करण्यात आला आहे. तर, गोवा आणि लागून असणाऱ्या कर्नाटक किनारपट्टी क्षेत्राला पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबईसह ठाणे आणि पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये वादळी पावसाचा इशारा देण्यात आला असून, पश्चिम महाराष्ट्रातील घाटमाथ्यावरही ढगांची दाटी असेल असा इशारा देण्यात आला आहे. यादरम्यान सोसाट्याचा वारा वाहणार असून वाऱ्याचा वेग ताशी ३० ते ४० किमी इतका असेल.
या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट :
रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूर, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
या जिल्ह्यांना येलो अलर्ट :
मुंबई, ठाणे, नाशिक, जळगाव, नगर, पुणे, छत्रपती संभाजीनगर, जालना, धाराशिव, लातूर, यवतमाळ, गडचिरोली, पालघर, नंदुरबार, धुळे, सांगली, सोलापूर, बुलडाणा, अकोला, वाशीम, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे.