धक्कादायक: BSF जवानांची बस खोल दरीत कोसळली; ३ जवानांचा मृत्यू, ३२ जण जखमी!

जम्मू-काश्मीर: जम्मू काश्मीर राज्यातील बडगाम येथे एक मोठा अपघात घडला आहे. सीमा सुरक्षा दल (BSF) जवानांच्या बसला अपघात झाला असून बीएसएफ जवानांची ही बस बडगाम येथे दरीत कोसळली. या दुर्घटनेमध्ये अनेक जवान जखमी झाले आहेत. तसेच, या बसमधून ३५ बीएसएफचे जवान प्रवास करत होते. त्यामुळे यात अनेक जवान जखमी झाले असल्याचे समजते.

दरम्यान, निवडणुकीच्या ड्युटीवर असलेल्या या बसमध्ये बीएसएफचे एकूण ३५ जवान होते. या अपघातात तीन जवानांना मात्र आपला जीव गमवावा लागला आहे.

निवडणूक ड्युटीवर जात असताना अपघात!

माहितीनुसार, विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदानासाठी निवडणूक ड्यूटीवर जात असलेल्या बीएसएफ जवानांच्या बसला मध्य काश्मीरमधील बडगाम जिल्ह्यातील वाटरहाल परिसरात अपघात झाला. बस दरीत कोसळल्याने ३२ जवान जखमी झाले आहेत. जखमींपैकी काहींची प्रकृती गंभीर आहे. तसेच, मध्य काश्मीरच्या बडगाम जिल्ह्यातील ब्रिल गावाजवळ डोंगराळ व वळणावळणाच्या रस्त्यावरून जात असताना चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले व बस दरीत कोसळली असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

स्थानिक लोक मदतीला धावले!

३५ बीएसएफ जवानांना घेऊन जाणारी बस खोल दरीत कोसळल्यानंतर खडकांवर आदळली. बस उंचीवरून दगडांवर आदळल्यानंतर मोठा आवाज झाला. अपघाताचा आवाज ऐकून स्थानिक लोक मदतीला धावले. अन्य गाडीतील जवान व स्थानिकांनी तातडीने मदतकार्य सुरू करून जखमी जवानांना दरीतून वर काढले व रुग्णालयात हलवले. दरम्यान, अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. व तात्काळ पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने जवानांना बसमधून बाहेर काढले.