नागपूर : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) विदर्भासह महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमित शाह यांचा हा दौरा महत्त्वाचा ठरणार आहे. त्यामुळे सध्या, महायुतीत जागावाटपाच्या चर्चेला वेग आला आहे. अमित शाह या दौऱ्यात भाजप नेत्यांकडून सध्याच्या स्थितीचा आढावा घेतील, अशी माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.
दरम्यान, यावेळी अमित शाह पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार आणि त्याच दिवशी दुपारी संभाजीनगरला पक्षाची बैठक असणार. २५ सप्टेंबरला नाशिकला आणि एक बैठक पश्चिम महाराष्ट्राची सोलापूरला प्रस्तावित करण्यात आली असून, २४ आणि २५ सप्टेंबरला महाराष्ट्रातल्या कार्यकर्त्यांशी संवाद ते साधणार आहेत, असे बावनकुळे यांनी सांगितले. ते नागपूर विमानतळावर माध्यमांशी संवाद साधत होते. यावेळी बावनकुळे यांनी भाजपवर सतत होणाऱ्या टीकेला देखील प्रत्युत्तर दिले असून नितेश राणेंची पाठराखण केली आहे.
नितेश राणेंचे वक्तव्य हे राज्यातील मुस्लिमांबाबत नाही!
नितेश राणे यांनी मुस्लिमांबद्दल केलेल्या आक्षेपार्ह विधानाची सध्या राज्यभर चर्चा आहे. विरोधी पक्षाच्या नेत्यांनी त्यांच्यावर टीका केली आहे. भाजप नेते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील राणे यांना वादग्रस्त वक्तव्य टाळा, असा सल्ला दिला होता. मात्र याबाबत बावनकुळे यांना विचारले असता ते म्हणाले, नितेश राणेंचे वक्तव्य हे राज्यातील मुस्लिमांबाबत आणि देशातील नसल्याचे स्पष्टीकरण त्यांनी दिले. या देशामध्ये राहून काही मुस्लिम पाकिस्तान आणि बांगलादेशची भाषा बोलत आहे. जे मुस्लिम भारतात प्रेमाने राहतात त्यांच्याबद्दल नितेश राणे बोलले नाहीत तर भारताबद्दल जे विरोधी मत व्यक्त करतात त्यांच्याबद्दल राणे बोलले, असे बावनकुळे स्पष्ट म्हणाले आहेत.
उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री व्हायचे आहे!
उद्धव ठाकरे यांना कॉंग्रेस किती बेईमान आहे, हे आता कळले असेल. महाविकास आघाडीत मुख्यमंत्रीपदासाठी लढाई सुरू आहे. काँग्रेस आणि शरद पवारांना जेवढा उद्धव ठाकरे यांचा वापर करायचा होता तेवढा त्यांनी केला, असा टोला त्यांनी यावेळी लगावला. तसेच, मुख्यमंत्री कोण हे जाहीर करावे लागेल या भीतीने महाविकास आघाडीचे मेळावे बंद झाले आहेत. ठाकरे यांना मुख्यमंत्री व्हायचे आहे, परंतु कॉंग्रेस आणि शरद पवार त्यांना मुख्यमंत्री करायला तयार नाही, अशी टीका बावनकुळे यांनी केली.
ग्रामीण भागातील विकासाला चालना मिळेल!
ग्रामपंचायतींचे आर्थिक बळकटीकरण व्हावे, यासाठी महायुती सरकारने ऐतिहासिक निर्णय घेतला. ग्रामपंचायतीमध्ये होणाऱ्या विकासकामांची मर्यादा ३ लाखावरून १५ लाख केली. यामुळे ग्रामीण भागातील विकासाला चालना मिळेल, अशी देखील माहिती बावनकुळे यांनी दिली.