१२ हजार कोटींच्या सेमी कंडक्टर प्रकल्पाचे उद्घाटन; २४ हजार ५३८ कोटी एवढी गुंवतणूक, मिळणार ४०० लोकांना काम!

नवी मुंबई : महाराष्ट्रात बदल घडविणारे प्रकल्प सरकार आणत आहे. केंद्र आणि राज्य शासनाच्या सहकार्यामुळे उद्योग येत आहेत. इलेक्ट्रॉनिक्स सेमिकंडक्टर युनिटमध्ये ४०० लोकांना काम मिळणार आहे. या माध्यमातून अडवान्स टेक्नोलॉजी आपल्या राज्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपली अर्थव्यवस्था अकरा क्रमांकावरून पाचव्या क्रमांकावर आणली आहे. त्यामुळे लवकरच आपली अर्थव्यवस्था तिसऱ्या क्रमांकावर येईल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.

दरम्यान, महाराष्ट्रातील पहिल्या आयआरपी (IRP) इलेक्ट्रॉनिक्स कंपनीच्या माध्यमातून साकारणार्‍या सेमीकंडक्टर प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचा उद्घाटन सोहळा नवी मुंबईच्या एमआयडीसी क्षेत्रातील महापे येथे पार पाडला. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, निवृत्त अणुशास्त्रज्ञ अनिल काकोडकर, पीआरपी कंपनीचे संस्थापक राजेंद्र चोडणकर व हर्षदीप कांबळे आदी उपस्थित होते.

मोठे उद्योग महाराष्ट्रात आले!

यावेळी एकनाथ शिंदेंनी सांगितले की, प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात २४ हजार ५३८ कोटी एवढी गुंवतणूक करण्यात येणार आहे. दोन्ही टप्यातील घटकाची महाराष्ट्रातील एकूण गुंतवणूक ३६ हजार ५७३ कोटी एवढी असणार आहे. राज्यात उद्योग क्षेत्राला कॅपिटल सबसिडी आहे. रेड कार्पेट सुविधा आहेत. एक खिडकी योजना असल्यामुळे उद्योग क्षेत्र विकसित होत आहे. एमएमआर क्षेत्रच नव्हे तर गडचिरोली सारख्या भागातही औद्योगिक क्षेत्र विस्तारत असल्याचे त्यांनी सांगितले.

महाराष्ट्र हे पहिले राज्य – देवेंद्र फडणवीस!

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, भारत आणि जगालाही कोविडच्या काळात हे लक्षात आलेच की, ग्लोबल सप्लायर चैन खंडित झाली आहे. चीन, जपान यांच्याकडे सगळ्या प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक चिप्स आणि तत्सम गोष्टी या त्यांच्याच देशातून येतात. जगातील बहुतांश देश त्यांच्यावरच अवलंबून होते. त्यामुळे ही सिस्टिम डिस्टर्ब झाली. सेमिकंडक्टर क्षेत्रामध्ये भारताला पुढे जावेच लागेल. आपल्या देशाला जर जगामध्ये एक विकसित म्हणून प्रस्थापित व्हायचे असेल आणि जगाच्या संपूर्ण व्यवस्थेचा भाग व्हायचे असेल तर आपल्या देशात हा उद्योग नियोजनबध्दरित्या वाढवावा लागेल. मला या गोष्टीचा आनंद आहे की, सेमिकंडक्टर क्षेत्रामध्ये आपले स्वत:चे धोरण तयार करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे. हे सगळ्यात महत्त्वाचे असल्याचे फडणवीस म्हणाले.

महाराष्ट्रासाठी महत्त्वाचे पाऊल – अजित पवार!

अजित पवार म्हणाले की, सेमिकंडक्टर प्रकल्पामुळे डिजिटल क्रांतीला आणि उद्योगाला गती मिळणार असून महाराष्ट्रासाठी हे महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे. उद्योग क्षेत्राला गती देण्याचा निर्णय सरकारने घेतला असून उद्योगाचे विकेंद्रीकरण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तसेच, उद्योगासाठी अनेक प्रकारच्या सवलती देखील देण्यात आल्या आहेत. या प्रकल्पामध्ये १२ हजार कोटींची गुंतवणूक करण्यात आली असल्याची माहिती अजित पवार यांनी यावेळी दिली.