‘स्त्री २’ ठरला बॉक्स ऑफिसवर सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट; मोडला ‘या’ चित्रपटाचा रेकॉर्ड!

बॉलिवूड : अभिनेत्री श्रद्धा कपूर आणि अभिनेता राजकुमार राव स्टारर हॉरर कॉमेडी चित्रपट ‘स्त्री २’ ने इतिहास रचला आहे. ‘स्त्री २’ हा देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. १५ ऑगस्ट रोजी हा चित्रपट रुपेरी पडद्यावर प्रदर्शित झाला. १७ सप्टेंबरपर्यंत या चित्रपटाला रिलीज होऊन ३४ दिवस पूर्ण झाले. आज, १८ सप्टेंबर रोजी या चित्रपटाने ३५ व्या दिवसात प्रवेश केला आहे. ‘स्त्री २’ ने ३४ व्या दिवशी देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर सर्वाधिक कमाई करून यशाचा झेंडा रोवला आहे.

दरम्यान, या चित्रपटाने ‘जवान’, ‘पठाण’, ‘अ‍ॅनिमल’, ‘गदर २’, ‘केजीएफ २’ आणि ‘बाहुबली २’ यांना मागे टाकले आहे. आता हा चित्रपट कमाईमध्ये नंबर वन बनला आहे. ‘स्त्री २’ सर्वकालीन नंबर १ हिंदी चित्रपट ठरल्याचा या चित्रपटाच्या निर्मात्यांचा दावा आहे.

बॉक्स ऑफिसवर ‘स्त्री २’ चा धमाका :

या डोळे दीपवणाऱ्या आकड्यांसह ‘स्त्री २’ ने देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर धमाकेदार कमाई केली आहे. ‘जवान’ ने भारतातील सर्व भाषांमध्ये ६४०.२५ कोटी रुपयांचा व्यवसाय केला होता. या चित्रपटाने हिंदी भाषेत ५८२. ३१ कोटी रुपये कमावले होते. ‘जवान’चे जगभरातील कलेक्शन ११६० कोटी रुपये आहे. ‘स्त्री २’ने आता ५८३.३० कोटी रुपयांची कमाई केली असून ‘जवान’च्या ५८३ कोटी रुपयांच्या कलेक्शनला मागे टाकले आहे. ३४ व्या दिवशी ‘स्त्री २’चे देशांतर्गत एकूण कलेक्शन ६६८.७५ कोटी रुपये झाले आहे. या चित्रपटाने परदेशात १३० कोटींची कमाई केली आहे. ‘स्त्री २’ चित्रपटाने रिलीजच्या ३४ व्या दिवशी ३.१ कोटीचा व्यवसाय केला आहे.

‘स्त्री २’ च्या टीमने नव्या रेकॉर्डला दिला दुजोरा!

‘स्त्री २’ च्या टीमने सोशल मीडियावर पोस्ट करत लिहिले की, ‘भारताच्या बॉक्स ऑफिसवरील पहिल्या क्रमांकाचा हिंदी चित्रपट’. “ती स्त्री आहे आणि तिने करुन दाखवले आहे. हिंदुस्तानातील सर्वोत्कृष्ट नंबर १ हिंदी चित्रपट”. पुढे त्यांनी लिहिले आहे की, “आमच्यासह हा इतिहास रचण्यासाठी सर्वाच चाहत्यांचे खूप सारे आभार. स्त्री २ अद्यापही चित्रपटगृहांमध्ये यशस्वीपणे सुरु आहे. चित्रपटगृहांमध्ये या, आणखी काही रेकॉर्ड्स रचूयात” असे ते म्हणाले.

‘स्त्री २’ ने देशभरातील चाहत्यांच्या अपेक्षा केल्या पूर्ण!

अमर कौशिकने दिग्दर्शित केलेल्या ‘स्त्री २’ मध्ये वरुण धवन आणि अक्षय कुमार यांचा कॅमिओ देखील आहे. स्त्री चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच गाजला होता. यामुळे सिक्वेलकडून प्रेक्षकांना फार अपेक्षा होत्या. त्यानुसार ‘स्त्री २’ ने देशभरातील चाहत्यांच्या अपेक्षा पूर्ण केल्या असून मने जिंकली आहेत. या चित्रपटात पंकज त्रिपाठी, अभिषेक बॅनर्जी आणि अपारशक्ती खुराना यांच्याही भूमिका आहेत.