अमरावती : काँग्रेसचे खासदार, विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul gandhi) यांनी अमेरिकेत आरक्षणाबाबत केलेल्या वक्तव्यावरून देशात बराच वादंग झाला. भाजपने राहुल गांधी यांच्याविरोधात आंदोलनही केले. त्याचदरम्यान शिवसेना नेते संजय गायकवाड यांनी राहुल गांधी यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले होते. ‘जो राहुल गांधीची जीभ छाटेल त्याला ११ लाखांचे बक्षीस देणार’ असे वक्तव्य गायकवाड यांनी केले, त्यानंतरही बराच गदारोळ झाला. मात्र आता भाजप खासदाराचीही जीभ घसरली आहे.
दरम्यान, राहुल गांधींची जीभ छाटू नये, त्यांच्या जिभेला चटके द्यायला हवे असे वादग्रस्त वक्तव्य भाजप खासदार अनिल बोंडे यांनी केले आहे. शिंदेंच्या आमदारानंतर आता भाजप नेत्याच्या या वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
काय म्हणाले अनिल बोंडे?
संजय गायकवाड यांनी जीभ छाटण्याची केलेली भाषा योग्य नाहीये. परंतु राहुल गांधी आरक्षणासंदर्भात जे बोलले ते अतिशय भयानक आहे. विदेशात जाऊन वात्रटासारखे कोणी बोलत असेल तर त्यांची ‘जीभ छाटू नये जिभेला चटके दिले पाहिजे’ अशा लोकांच्या जिभेला चटके देणे आवश्यक आहे, अशी खोचक टीका अनिल बोंडे यांनी केली. राहुल गांधी, ज्ञानेश महाराव असो अथवा श्याम मानव असोत असे म्हणत बोंडे यांनी ज्ञानेश महाराव, श्याम मानव यांच्यावरही टीका केली. व म्हणाले, भारतातील जनतेच्या भावना जे दुखावतात त्या लोकांना किमान जाणीव तरी करून द्यायला हवी म्हणून ‘जीभ छाटू नये तर जिभेला चटके’ मात्र निश्चितच दिले पाहिजे’ असा पुनरुच्चार अनिल बोंडे यांनी केला.
काँग्रेस कार्यकर्त्यांचे आंदोलन!
अनिल बोंडे यांच्या वक्तव्याविरोधात आता काँग्रेस पक्ष आक्रमक झाला आहे. अमरावती शहर पोलीस आयुक्त कार्यालयात काँग्रेस नेत्या आमदार यशोमती ठाकूर आणि खासदार बळवंत वानखडे यांच्या सह काँग्रेस कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. या आंदोलनात अनिल बोंडे यांच्यावर गुन्हे दाखल करून अटक करण्याची मागणी त्यांनी केलीय. जोपर्यंत गुन्हा दाखल करुन अटक होत नाही तोपर्यंत ठिय्या आंदोलन असेच सुरु राहणार असा कडक इशाराच यशोमती ठाकूर यांनी दिला.
दिल्ली पोलिसात तक्रार दाखल!
दिल्ली पोलिसात संजय गायकवाड यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली असून, दिल्लीतील तुघलक रोड पोलिसात ही तक्रार दाखल झाली असल्याचे समजते. यामध्ये केंद्रीय मंत्री रवनीत बिट्टू आणि तरविंदर मारवाह यांच्यावरही तक्रार दाखल करण्यात आलीय. दरम्यान, राहुल गांधींवर टीका करणाऱ्या नेत्यांना मारले पाहिजे असे काँग्रेस नेते चंद्रकांत हंडोरे म्हणालेत. त्यांनी मुंबईत टीका करणाऱ्यांविरोधात आंदोलन करून निषेध केलाय.
काँग्रेस अध्यक्षांचे पंतप्रधानांना पत्र!
काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून राहुल गांधींविरोधात द्वेषपूर्ण भाषेवर चिंता व्यक्त केलीय. राहुल गांधींना भाजपचे नेते सतत जीवे मारण्याच्या धमक्या देत आहेत. भविष्यासाठी हे घातक आहे. अशा नेत्यांवर अंकुश ठेवा आणि त्यांच्यावर कारवाई करा, अशी मागणी खरगे यांनी पत्रातून केली आहे.