भारताने अंतिम फेरीत चीनचा १-० असा पराभव करून एशियन चॅम्पियन्स ट्रॉफी २०२४ चे विजेतेपद पटकावले आहे. पहिले तीन क्वार्टरमध्ये एक पण गोल झाला नव्हता, पण अखेर टीम इंडियाने चौथ्या आणि शेवटच्या क्वार्टरमध्ये शानदार गोल करत १-० अशी आघाडी घेतली, जी शेवटपर्यंत कायम राहिली. भारताच्या जुगराजने सामन्यातील एकमेव गोल केला. तसेच, इतिहासात भारताने एशियन चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकण्याची ही पाचवी वेळ असल्याचे समजते.
दरम्यान, एशियन चॅम्पियन्स ट्रॉफी २०२४ हॉकी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात जबरदस्त रोमांच पाहायला मिळाला. क्षणाक्षणाला उत्कंठा वाढवणाऱ्या या सामन्यात पहिल्यांदाच फायनलमध्ये धडक देणाऱ्या चीनने भारताला झुंजवले, पण हार मानेल तो भारतीय संघ कसला. एकजुटीचे बळ दाखवत भारतीय संघाने चीनला शेवटपर्यंत अक्षरशः लोळवले होते.
दोन्ही संघांकडून गोल करण्याचा पुरेपूर प्रयत्न!
सामन्याच्या सुरुवातीलाच चीन खुप आक्रमक खेळत होता, पण पहिल्या क्वार्टरमध्ये भारताला दोन पेनल्टी कॉर्नर मिळाले. मात्र दोन्ही वेळा चीनच्या गोलरक्षकाने आपला गोलपोस्ट सुरक्षित ठेवला. दुसऱ्या आणि तिसऱ्या क्वार्टरमध्येही दोन्ही संघांनी गोल करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. पण सामन्यातील एकमेव गोल ५१ व्या मिनिटाला झाला, जिथे भारतीय कर्णधार हरमनप्रीत सिंगने जुगराजला पास दिला आणि त्याने चेंडू गोलपोस्टमध्ये मारून शानदार गोल केला.
भारताचे सुवर्णपदक तर चीनचे रौप्यपदक!
या विजयासह भारताने सुवर्णपदक तर चीनने रौप्यपदक पटकावले आहे. तर तिसऱ्या स्थानासाठी झालेल्या सामन्यात पाकिस्तानने दक्षिण कोरियाचा ५-२ असा पराभव केला होता. शेवटच्या क्षणांमध्ये चीनच्या खेळाडूंनी चेंडूवर बराच वेळ ताबा ठेवला, पण भारताचा बचावही उत्कृष्ट होता. याआधी, भारत आणि चीन स्पर्धेचा गट पहिल्या टप्प्यात आमनेसामने आले होते, जिथे टीम इंडियाने ३-० असा सहज विजय नोंदवला होता.
भारताने विजेतेपद कधी जिंकले?
एशियन चॅम्पियन्स ट्रॉफी २०११ मध्ये सुरू झाली, जिथे भारताने अंतिम फेरीत पाकिस्तानला पेनल्टी शूटआउटमध्ये ४-२ ने पराभूत करून विजेतेपद पटकावले. त्यानंतर २०१६ मध्ये भारताने पुन्हा एकदा पाकिस्तानचा ३-२ असा पराभव करत चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली. २०१८ मध्ये भारत आणि पाकिस्तान यांना संयुक्त विजेते घोषित करण्यात आले. २०२३ मध्ये झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात भारताने मलेशियाचा ४-३ असा पराभव करून चौथ्यांदाही ट्रॉफी जिंकली होती.