Big Breaking : राहुल गांधींची जीभ छाटा, 11 लाख मिळवा! महाराष्ट्रातील नेत्याची जीभ घसरली!

बुलढाणा : काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul gandhi) यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावर केलेल्या वक्तव्यावर शिवसेना आमदार संजय गायकवाड (Sanjay gaykwad) यांनी संताप व्यक्त केला आहे. राहुल गांधी यांची जीभ छाटून आणून देणाऱ्यास ११ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले जाईल, असे ते म्हणाले आहेत. त्यांच्या या वादग्रस्त विधानानंतर राजकीय वातावरण सध्या तापले आहे.

दरम्यान, आज (१६ सप्टेंबर) संजय गायकवाड यांनी बुलढाणा येथील त्यांच्या कार्यालयात पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते म्हणाले, काँग्रेसचा खरा चेहरा समोर आला आहे. जे त्यांच्या पोटात होते ते आता बाहेर आले असल्याचे गायकवाड यांनी सांगितले आहे.

नेमके काय म्हणाले संजय गायकवाड!

राहुल गांधी यांना मागासवर्गीय आदिवासी सह इतरांचे शंभर टक्के आरक्षण (Reservation) संपवायचे आहे. आरक्षण संपवण्याची भाषा करून त्यांच्या मनातील ओठावर आले. काँग्रेसचा खरा चेहरा समोर आला असून जो राहुल गांधीची जीभ छाटेल, त्याला ११ लाखांचे बक्षीस (Award) देण्यात येईल, असे वादग्रस्त विधान संजय गायकवाड यांनी केले आहे.

संविधान (Constitution) धोक्यात आहे!

महाराष्ट्र आणि देशात आरक्षणाची आग लागली आहे. त्यातच मागासलेल्या जातींना इतर समाजांच्या बरोबरीने उभे करताना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आरक्षण दिले. असे असताना काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी विदेशात जाऊन आमच्या देशातले आरक्षण मला संपवायचे, असे वक्तव्य केले. काँग्रेसचा खरा चेहरा आणि त्यांच्या पोटातील मळमळ राहुल गांधींनी ओकून दाखवली आहे. आपले संविधान धोक्यात आहे, संविधानात असलेले आपले आरक्षण काँग्रेस संपवणार आहे, त्यांनी फेक नरेटिव्ह पसरवला आणि दलित समाजाची मते घेतली, आणि आज आरक्षण संपवण्याची भाषा करत आहेत, असेही संजय गायकवाड म्हणाले आहेत.

राहुल गांधी नेमके काय म्हणाले होते?

अमेरिकेमध्ये (America) एका मुलाखतीत बोलताना राहुल गांधी यांनी भारतातील आरक्षणावरुन महत्वाचे विधान केले होते. भारतात पक्षपातीपणा थांबेल तेव्हा आरक्षण संपवण्याचा विचार करु. मात्र, सध्या देशामध्ये तशी स्थिती नाही. योग्य वेळ येईल तेव्हा याबाबत विचार केला जाईल, असे राहुल गांधी म्हणाले होते. मात्र, राहुल गांधी यांनी आरक्षण संपवण्याचे विधान केल्याचा दावा करत भाजप (BJP) तसेच समविचारी पक्षांनी आक्रमक भूमिका घेतली आणि राहुल गांधींच्या या विधानावरुन राज्यात भाजपने आंदोलने देखील केली.