नवी दिल्ली : करिअरमध्ये एकदा तरी गुगल या नामांकित कंपनीत काम करावे असे स्वप्न असते. गुगल ही जगप्रसिद्ध कंपनी अनेक तरुणांसाठी ड्रिम जॉब असते. मात्र हे स्वप्न अनेकांसाठी स्वप्नच राहते, तर काहींना मात्र गुगल मध्ये काम करण्याची मोठी संधी मिळते. अशीच संधी एका तरुणीला मिळाली आहे. गुगलमध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून तरुणी नोकरीला लागली असून तिला तब्बल ६० लाखांचे पॅकेज देण्यात आले आहे.
दरम्यान, अलंकृता साक्षीला गूगल कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनियर पदावर नोकरी मिळाली आहे. अलंकृता साक्षी ही मूळची भागलपुर जिल्ह्यातील सिमरा गावची होती. आता ती सध्या झारखंडमध्ये राहत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अलंकृता साक्षी हिने याआधी विप्रो, सॅमसंग यांसारख्या मोठ्या कंपनीत काम केले होते. अलंकृता साक्षीचे वडील झारखंडमध्ये एका प्रायव्हेट कंपनीत कामाला आहेत तर तिची आई शाळेत शिक्षिका आहे.
अलंकृताचे शिक्षण कुठे आणि किती झाले?
अलंकृताचे लहानपण झारखंडमधील कोडरमामध्ये गेले. तिने दहावीपर्यंतचे शिक्षण कोडरमामधून केले, तर बारावीचे शिक्षण कोडरमामधील जवाहर नवोदय विद्यालयातून झाले. त्यानंतर तिने हजारीबागमधून बी.टेकची पदवी घेतली. गुगलमध्ये नोकरी मिळण्याआधी तिने बेंगळुरूमधील विप्रो कंपनीत दोन वर्ष नोकरी केली, नंतर एक वर्ष अर्न्स्ट अँड यंग या कंपनीत आणि एक वर्ष सॅमसंग हार्मनमध्ये काम केले होते.
कुटुंबात आनंदाचे वातावरण!
अलंकृताला गुगलमध्ये नोकरी मिळाल्याने तिच्या कुटुंबात आणि सासरच्या लोकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. अलंकृताचे सासरे राजीव नयन चौधरी यांनी सुनेच्या यशावर अभिमान असल्याचे म्हटले आहे. तसेच, ‘गुगलसारख्या जगप्रसिद्ध कंपनीत ६० लाख रुपयांच्या पॅकेजवर काम करण्याची संधी मिळणे ही खूप अभिमानाची गोष्ट आहे’, असे म्हणत त्यांनी कौतुकही केले आहे.
सोशल मीडिया वर पोस्ट काय?
अलंकृताने लिंक्डइनवर (Linkdin) तिच्या गुगल कंपनीत मिळालेल्या नोकरीबद्दल माहिती देत लिहिले, मी या संधीबद्दल कृतज्ञ आहे. नाविन्याचा शोध असलेल्या टीमसोबत काम करण्यास उत्सुक असून माझ्या संपूर्ण प्रवासात ज्यांनी मला साथ दिली त्या सर्वांचे खूप खूप आभार. तुमचे प्रोत्साहन आणि मार्गदर्शन अमूल्य आहे.