अरविंद केजरीवाल मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार; दिल्लीचा पुढचा मुख्यमंत्री कोण?

नवी दिल्ली : मद्य धोरण घोटाळाप्रकरणी सीबीआयच्या (CBI) अटकेत असलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांना सर्वोच्च न्यायालयाने नुकताच जामीन मंजूर केला आहे. त्यामुळे जेलमधून बाहेर येताच अरविंद केजरीवाल यांनी रविवारी दिल्लीत आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधताना एक मोठी घोषणा केली आहे.

दरम्यान, तिहार तुरुंगातून १३ सप्टेंबर रोजी बाहेर पडल्यानंतर केजरीवाल यांनी आज पहिल्यांदा आम आदमी पार्टीच्या ऑफिसमध्ये कार्यकर्त्यांना संबोधित केले. यादरम्यान त्यांच्यासोबत AAP चे नेता मनीष सिसोदिया, संजय सिंह हे देखील उपस्थित होते.

काय म्हणाले अरविंद केजरीवाल?

सीता जेव्हा वनवासातून परतली होती तेव्हा तिला अग्निपरीक्षा द्यावी लागली. आज मी तुरुंगातून बाहेर आलो आहे आणि मी अग्निपरीक्षा देण्यास तयार आहे. त्यामुळे मी २ दिवसांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार आहे. जोपर्यंत जनता निकाल देत नाही तोपर्यंत मी मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसणार नाही. मी प्रत्येक घराघरात जाऊन रस्त्यावर जाईन आणि जोपर्यंत जनता निकाल देत नाही तोपर्यंत मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसणार नाही, असा निर्धार अरविंद केजरीवाल यांनी केला आहे.

पुढचा मुख्यमंत्री कोण?

मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी कोणाकडे द्यायची याचा निर्णय एक-दोन दिवसांत होईल. मी जे म्हणतो तेच मनीषजीही म्हणतात. येत्या दोन दिवसात मी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देईन. तसेच, या काळात आम आदमी पक्षाच्या विधिमंडळ पक्षाची बैठक होईल. त्या बैठकीत माझ्याऐवजी आपमधील दुसरा कोणत्यातरी नेत्याची मुख्यमंत्रीपदी निवड केली जाईल, असे अरविंद केजरीवाल यांनी सांगितले. दरम्यान, दिल्लीच्या निवडणुका आजपासून काही महिन्यांवर आहेत, जर तुम्हाला केजरीवाल प्रामाणिक वाटत असेल तर आगामी निवडणुकीत माझ्या बाजूने मतदान करा. तुमचे प्रत्येक मत माझ्या प्रामाणिकपणाचे प्रमाणपत्र असेल, असे आवाहन देखील केजरीवाल यांनी दिल्लीच्या जनतेला केले आहे.

भाजप महत्त्वाचा नाही, जनता माझ्यासाठी महत्त्वाची!

आमच्या प्रामाणिकपणाची त्यांना (भाजप) भीती वाटते, ते अप्रामाणिक असल्यामुळे मोफत वीज देऊ शकत नाहीत. अनेक राज्यात त्यांची सरकारे आहेत पण ते उपचार देऊ शकत नाहीत, शाळा दुरुस्त करू शकत नाहीत. त्यांनी आमच्याविरुद्ध ईडी, सीबीआय सोडले पण आम्ही प्रामाणिक आहोत. ते माझ्यावर चिखलफेक करत आहेत, सकाळ संध्याकाळ शिवीगाळ करत आहेत. पण माझ्यासाठी भाजप महत्त्वाचा नाही, तुम्ही लोक माझ्यासाठी महत्त्वाचे आहेत. मी आयुष्यात काहीही कमावले नाही पण मान मिळवला आहे, असा हल्ला केजरीवाल यांनी भाजपवर चढवला.